अवकाळी, कोरोनाने केल्या द्राक्ष बागा भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

घडलेल्या घटनेने हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या या नुकसानीचे पंचमाने करण्यास कोरोनामुळे माहिती देऊनही तलाठी अथवा कोणताही महसूल, कृषी खात्याचा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नाही. त्याबद्दल शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली.

राशीन : मंगळवारी (ता.31) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिंपोरा (ता.कर्जत) शिवारात अवकाळी पावसाच्या सरींसह आलेल्या जोरदार वादळाने द्राक्षांच्या घडांनी बहरलेली रमेश लालासाहेब काळे यांची एक एकरातील द्राक्षबाग अक्षरश: जमीनदोस्त केली. यामध्ये सुमारे पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

अवघ्या दहा मिनिटांसाठी आलेल्या या वादळाने होत्याचे नव्हते केल्याने मोठया कष्टाने वाढवलेली द्राक्ष बागेने डोळयासमोर लोळल्याचे पाहून शेतकऱ्यास अश्रू अनावर झाले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अगोदरच बाजारपेठेवर कुऱ्हाड कोसळल्याने शेतकऱ्यांच्या मालास कोठेही मागणी राहिली नाही. बाजारपेठा बंद पडल्याने शेतातच काही मालाची माती होत आहे, असे असताना किमान झालेला खर्च तरी या द्राक्ष बागेतून मिळेल अशी अपेक्षा काळे यांना होती.मात्र अवकाळीच्या वाऱ्याने या अपेक्षेवर पाणी टाकले. 
गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक अवकाळी पावसाचे वातावरण तयार होत आहे. कधी पाऊस तर कधी सोसाटयांचा वारा येत असल्याने उभ्या पिकांना या अवकाळीच्या वातावरणाचा फटका बसत आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राशीनसह परिसरात आकाश ढगांनी भरून आले होते. त्यात जोराचे वारेही वाहत होते. याच वाऱ्याने शिंपोरा परिसरात हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

घडलेल्या घटनेने हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या या नुकसानीचे पंचमाने करण्यास कोरोनामुळे माहिती देऊनही तलाठी अथवा कोणताही महसूल, कृषी खात्याचा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नाही. त्याबद्दल शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली.

काढणीस आलेला माल या द्राक्ष बागेत होता. पंधरा लाखांपेक्षा जास्त नुकसान यामध्ये झाले आहे. सरकारने अशा नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे.

-रमेश काळे, शेतकरी.

मी संबंधित तलाठयास नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.पंचनामा केला जाईल. 
- अर्चना नष्टे, प्रांताधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain, loss of grape gardens by Corona