बेळगाव : महापालिकेचे प्रवेशद्वारच पाण्यात

नेहमीची समस्या ः कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
Rain water in entrance Belgaum Municipal Corporation
Rain water in entrance Belgaum Municipal Corporation sakal

सुभाषनगर : पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. लोक मदतीसाठी महापालिका कार्यालयाशी संपर्क साधत आहेत. पण, महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे महापालिका लोकांची मदत कशी करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. ते पाणी शुक्रवारी दिवसभर तसेच होते. नगरसेवक बाबाजान मतवाले व रवी साळुंके शुक्रवारी महापालिका कार्यालयात गेले होते. प्रवेशद्वारावरील समस्या पाहून त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून समस्या सोडविण्याची सूचना केली. पर्यावरण अभियंता प्रवीणकुमार यांनी सकिंग मशिनच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करण्याची सूचना आरोग्य निरीक्षक पुंडलिक राठोड यांना दिली. पण, सकिंग मशिन उपलब्ध होऊ न शकल्याने पाण्याचा उपसा झाला नाही. आयुक्त व अधिकाऱ्यांची वाहने शुक्रवारी दिवसभर त्या साचलेल्या पाण्यातून नेण्यात आली. पण, एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने ती समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला नाही.

महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावजवळ नेहमीच पावसाचे पाणी साचते. कार्यालयाच्या आवारात नवे उद्यान तयार केल्यापासून ही समस्या उद्भवली आहे. उद्यानाच्या बाजूला हे पाणी साचते. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आऊटलेट तयार केलेले नसल्याने ते साचून राहते. गेल्या महिन्यात निवृत्त झालेले सहाय्यक कार्यकारी अभियंता महांतेश नरसण्णावर यांनी त्या समस्येवर उपाय शोधला होता. त्याचे एस्टीमेट तयार करण्याची सूचना पर्यावरण विभागाला दिली होती. पण, पर्यावरण विभागाने एस्टीमेट तयार केले नसल्याने समस्‍या सुटली नाही.

दरम्यान नरसण्णावर निवृत्त झाल्याने नवे सहाय्यक कार्यकारी अभियंता बाहुबली चौगुला यांच्यावर जबाबदारी आली आहे. पण, त्यासाठी आरोग्य व पर्यावरण विभागाकडून पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी उत्तर उपविभाग २ या कार्यालयाकडे आहे. पण, ही समस्या आरोग्य व पर्यावरण विभागाकडून सोडविली जाऊ शकते.

महापालिकेचे अपयश

एकीकडे शहर स्मार्ट झाल्याचा दावा केला जात असताना महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातच पावसाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या महापालिका इतक्या दिवसात सोडवू शकत नसेल तर शहरातील समस्या कशी सोडविणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com