
सांगलीत वादळी वारे, गारपीटीचा तडाखा
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह मिरज पूर्व भाग आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांना शनिवारी उत्तररात्री वादळी वारे आणि गारपीटीचा तडाखा बसला. विजांचा कडकडाट, वेगवान वादळी वारे आणि जोराच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले. शहरातील विस्तारीत भागात दाणादाण झाली. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वीज वितरण व्यवस्था कोलमडली. तासाभरात मोठे नुकसान झाले. शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. अजिबात वारे नव्हते. घामाच्या धारा लागल्या होत्या. रात्री चांदणे होते. रात्री बारानंतर वातावरण बदलत गेले. उत्तर रात्री दोनच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पुढच्या तासाभरात भिती वाटावी, असे वातावरण तयार झाले. वीजांचा प्रचंड कडकडाट सुरु झाला. अर्धा तासाच्या तुफान, वादळी पावसानंतर गारपीट सुरु झाली. मोठमोठ्या गारा पडल्या. विशेषतः मिरजेच्या पूर्व भागाला गारपीटीचा तडाखा बसला. या भागात एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे. प्रचंड पावसाने शेताच्या ताली भरल्या. हा पाऊस उन्हाळी मशागतीसाठी चांगला मानला जात असला तरी वादळी वाऱ्याने झालेले नुकसान मोठे आहे.
तासाभरात नुकसान
मिरज पूर्व भागात गारपीट
वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठे नुकसान
झाडे कोसळून रस्ते झाले बंद
वीजांच्या कडकडाटाने भितीचे वातावरण
पत्र्याचे शेड, जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले
उद्या, परवा पुन्हा पाऊस
उत्तररात्री झालेल्या जोरदार पाऊस, गारपीटीनंतर सकाळपासून वातावरण पूर्ण पावसाळी राहिला. सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यातील अनेक भागांत मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) पुन्हा वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर वातावरणत बदल होतील आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णाचा तडाखा वाढतच जाणार आहे.
Web Title: Rain With Stormy Winds Hailstorm In Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..