इस्लामपूर - राजारामबापू सहकारी बँकेने सांगली जिल्ह्यात घेतली आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil and Shamrao Patil

सांगली जिल्हा सहकारी नागरी बँक्स असोसिएशन यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यातील १९ नागरी सहकारी बँकांची आकडेवारी जाहीर झाली आहे.

इस्लामपूर - राजारामबापू सहकारी बँकेने सांगली जिल्ह्यात घेतली आघाडी

इस्लामपूर - सहकारी बँकांच्या क्षेत्रात पेठ (ता. वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेने सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ३४८६.८१ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करत जिल्ह्यातील बँकांमध्ये राजारामबापू बँकेने अव्वल स्थान पटकावले आहे. याबरोबरच ठेवी, कर्जे, प्रति सेवक व्यवसाय आणि गुंतवणूक याबाबतीतही राजारामबापू बँक आहे जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत आघाडीवरच राहिली आहे.

सांगली जिल्हा सहकारी नागरी बँक्स असोसिएशन यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यातील १९ नागरी सहकारी बँकांची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील तसेच प्रा. शामराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही बँक अव्वल स्थानावर आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा झाली. या सभेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील १९ बँकांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये राजारामबापू बँक शाखा ४६, सेवक वर्ग ३८५, भाग भांडवल ४६.७ कोटी, स्वनिधी २४४.३१ कोटी, एकूण ठेवी २०९०.९२ कोटी, एकूण कर्जे १३९५.८९ कोटी, गुंतवणूक ७९०.५२ कोटी या आकडेवारीच्या जोरावर जिल्ह्यात अव्वलस्थानी राहिली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ३४८६.८१ कोटी इतका झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सांगली अर्बन बँक आहे. या बँकेचा १७४२.३३ कोटीचा एकूण व्यवसाय आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आहे. या बँकेचा एकूण व्यवसाय ८८९.६४ कोटी इतका आहे. या पाठोपाठ पलूस सहकारी बँक ७०७.१० कोटी, हुतात्मा बँक ६४३.८६ कोटी, बाबासाहेब देशमुख बँक ५९५.०९ कोटी, आष्टा पीपल्स बँक ५३६.९१ कोटी यांचे क्रमांक आहेत. प्रती सेवक व्यवसाय हा बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो.यावरून त्या त्या बँकेची कार्यक्षमता विचारात घेतली जाते. यातही राजारामबापू बँकेने आघाडी घेतली आहे. एकूण सेवकांची संख्या ३८५ आहे आणि या बँकेचा प्रति सेवक व्यवसाय ९.०६ कोटी इतका आहे. या पाठोपाठ प्रतिसेवक व्यवसायात बाबासाहेब देशमुख बँक ७.२६ कोटी, मानसिंग बँक ६.८२ कोटी, तासगाव अर्बन बँक ६.६२ कोटी, सांगली अर्बन बँक ६.१३ कोट यांचे क्रमांक आहेत.

ठेवीचा सरासरी व्याजदर देण्यात मात्र बाबासाहेब देशमुख बँक, मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी बँक म्हैशाळ व विटा अर्बन बँक या बँका आघाडीवर आहेत. या बँका सरासरी ७ टक्क्यांच्या वर व्याज देत आहेत. यात लक्ष्मी सहकारी बँक ७.६० टक्के, विटा अर्बन बँक ७.४२ टक्के, मानसिंग बँक ७.२२ टक्के तर बाबासाहेब देशमुख बँक ७.१८ टक्के व्याज दर देणाऱ्या बँका आघाडीवर आहेत.

'आमचे नेते जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांच्या माध्यमातून बँकेने नेहमी ग्राहकहित आणि बँकेच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. चुकीचे निर्णय होत नाहीत किंवा त्यांना पाठीशीही घातले जात नाही. राजकीय हस्तक्षेपापासून ही बँक दूर आहे, त्यामुळेच हे शक्य झाले आहे.'

- प्रा. शामराव पाटील, अध्यक्ष, राजारामबापू बँक

Web Title: Rajarambapu Coooerative Bank Topper In Sangli District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..