प्रतिटन 3200 मिळाले तरच ऊसतोड

Sugarcane
Sugarcane

जयसिंगपूर : यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाला 5 नोव्हेंबरपर्यंत विनाकपात एकरकमी प्रतिटन 3200 रुपये कारखानदारांनी जाहीर करावेत; अन्यथा शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकारू नयेत, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी आज मांडली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंधराव्या ऊस परिषदेत ते बोलत होते. या वर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे, साखरही फारशी शिल्लक नाही. त्यामुळे उसाच्या कांडीला सोन्याचा भाव येणार आहे. ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मालू ग्रुपच्या मैदानावर ही ऊस परिषद झाली.

खासदार शेट्टी म्हणाले, ""स्वाभिमानीची चळवळ शेतकऱ्यांसाठी आहे. यात जातपात, धर्माचा अडथळा कधीच येणार नाही. अर्जुनास ज्याप्रमाणे माशाचा डोळा दिसत होता, त्याच पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांचे हित दिसते. कोण काय म्हणतोय याकडे कधीच लक्ष दिले नाही. जोपर्यंत बळिराजाची फौज पाठीशी आहे, तोपर्यंत कोणाच्या टीकेची चिंता नाही. स्वत:साठी कधीच चळवळीचा वापर केला नाही. शेतकऱ्यांचा कळवळा करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. ज्यांचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत, ज्यांना डिसेंबर महिन्यातील उन्हातही छत्र्या घ्याव्या लागतात, त्यांना करपलेल्या चेहऱ्यांचे दु:ख कसे समजणार? पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी गोळ्या घालून मारले, त्यांनाच शेतकऱ्यांची काळजी वाटत आहे.''

ऊस दरप्रश्‍नी इंदापूर, कऱ्हाड, बारामतीत आंदोलने करावी लागली. सध्याच्या शासनाने आमच्या भावना समजून घेऊन प्रतिसाद दिल्यानेच आम्हाला आंदोलनापेक्षा चर्चेतून प्रश्‍न सोडवावेसे वाटले. कोणी म्हणतं, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर का आंदोलन केले नाही? मात्र त्यांनीच कारखानदारांना देणी देण्याबाबत पाठपुरावा केला आहे, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी चार वर्षांपूर्वीच लोकसभेत मागणी केली आहे. आज देश अस्वस्थ आहे. शेती करणाऱ्या मराठा बांधवालाही आरक्षणाची गरज आहे. कारण शेती तोट्यात गेली आणि वर्षानुवर्ष तोटा सोसून तो कर्जबाजारी झाला आहे. शेती करणाऱ्यांत मराठ्यांची संख्या अधिक आहे. पोराबाळांना शिकवून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असून, यासाठी पाठपुरावा करणार आहे, याचा राजू शेट्टी यांनी पुनरुच्चार केला.

या वेळी कोणाच्या सांगण्यावरून गाळप हंगाम डिसेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय झाला, हे वेगळे सांगायची गरज नाही. आजवर कधीच डिसेंबरमध्ये गाळप हंगामाला सुरवात झाली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाळप हंगाम डिसेंबरऐवजी 5 नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या दुसऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. बैठकीला सदाभाऊ खोत यांना निमंत्रित केले असते तर पहिल्याच बैठकीत हा निर्णय झाला असता.''
- राजू शेट्टी, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com