esakal | राजारामबापू कारखान्यासमोर शेट्टींचा ठिय्या; जयंतरावांना थेट आव्हान, एफआरपीसाठी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty sits in front of Rajarambapu factory; Direct challenge to Jayant patil, agitation for FRP

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अटक आणि स्थानबद्ध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः आज लोकनेते राजारामबापू कारखान्याच्या कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन केले.

राजारामबापू कारखान्यासमोर शेट्टींचा ठिय्या; जयंतरावांना थेट आव्हान, एफआरपीसाठी आंदोलन

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर (जि. सांगली)  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अटक आणि स्थानबद्ध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः आज लोकनेते राजारामबापू कारखान्याच्या कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन केले. एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांची कोंडी करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याने स्वतः राजू शेट्टी मैदानात उतरले आणि भर उन्हात त्यांनी मांडी घालून आंदोलन केले. 

आंदोलन दडपण्यासाठी अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. येत्या 15 दिवसांत एकरकमी एफआरपी न दिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कारखान्याचे नेते जयंत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील शेट्टी यांचे हे पहिलेच आंदोलन होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज येथील लोकनेते राजारामबापू पाटील साखर कारखान्यावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले. राज्य प्रवक्ते ऍड. शमशूद्दीन संदे, संदीप राजोबा प्रमुख उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले,""आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? लॉकडाऊनमुळे गेले वर्षभर शेतकरी होरपळून निघाला आहे. काहींचा रोजगार संपला आहे. आर्थिक बोजा शेतकऱ्यांवर आहे. भाजीपाला रस्त्यावर विकावा लागला, दुधाकडून तोटा झाला. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास वाटोळे होईल. उसाचा आधार होता; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे एकरी उत्पादन घटले. मोडकीतोडकी एफआरपी एकरकमी मिळत नसेल तर दुर्दैव आहे. कारखाना अडचणीत असेल तर तो इकडून तिकडून गोळाबेरीज करू शकतो, शेतकऱ्यांचे काय? मार्च अखेरमुळे बॅंका कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे आहेत. सहकार अन्याय करत असेल तर कारखान्यांनी रस्त्यावर उतरावे, शेतकरी त्यात सहभागी होतील. केंद्र सरकार साखरेचा दर वाढवत नसेल तर राज्य साखर संघाने आंदोलन करावे, आम्ही साथ देऊ. केंद्र सरकारला घाबरण्याची काहीच गरज नाही, त्याला जी काही ईडी चौकशी लावायची ती आमच्या मागे लागू दे.'' 

ते म्हणाले,""निर्यात अनुदानासाठी केंद्राशी भांडले पाहिजे. ऑफिसमध्ये बॉसकडून त्रास झाला म्हणून घरी जाऊन बायकोला बदडण्यासारखे सुरू आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपी दिली आहे. या कारखान्याने आपली परिस्थिती नाही असे जाहीर करावे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील अन्य काखानदारांशी चर्चा करून एफआरपी द्यायला भाग पाडावे.'' 

ते म्हणाले,""आंदोलन होणार म्हणून इस्लामपूर, आष्टा, कुरळप, कासेगाव, पलूस, विश्रामबाग, सांगली ग्रामीण या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 250 हून अधिक कार्यकर्त्यांना सकाळी लवकर ताब्यात घेतले. त्यामुळे मला इथे यावे लागले. एका बाजूला आंदोलन करू द्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन मॅनेज करायचे. कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे हे कारस्थान म्हणून पाडण्यासाठी मला कारखान्यावर आंदोलनाला यावे लागले. आठ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही त्याची दखल घेऊन चर्चा केली असती तर बरे झाले असते.'' 

सहकारमंत्र्यांच्या कारखान्यात जावू 

राजू शेट्टी म्हणाले, ""राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची नैतिक जबाबदारी आहे. तेच प्रतिटन 2500 रुपये द्यायला लागलेत, हे बरोबर नाही. लवकरच त्यांच्याही कारखान्यावर आंदोलन करू.'' 

केंद्राकडे अनुदान थकल्याने अडचणी : आर. डी. माहुली 

इस्लामपूर ः लोकनेते राजारामबापू पाटील कारखान्याचे केंद्र सरकारकडे 120 कोटींचे अनुदान थकले आहे. त्यामुळे अडचणी आहेत, मात्र लवकरच शेतकऱ्यांची उर्वरित बिले देऊ, अशी ग्वाही कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली. 

ते म्हणाले,""सन 2019-20 मधील एफआरपी देण्यासाठी कर्ज घेतले. 73 कोटी कर्ज देणे थकल्यामुळे नोटिसा आल्या. एफआरपीपेक्षा जास्त दर दिला म्हणून आयकर विभागाने 175 कोटींवर आम्हाला नोटिसा दिल्या होत्या. केंद्राने 600 रुपये निर्यात अनुदान जाहीर केले. त्याचे अद्याप 24 कोटी येणे बाकी आहेत. आधारभूत किंमत वाढवून मागच्या वर्षीचे अनुदान मिळाल्यास एक रुपयाही देणे राहणार नाही. उर्वरित 20 कोटींमध्ये साखर कामगारांचेही प्रश्न सोडवता येतील.'' 

ते म्हणाले, ""केंद्राकडे साखरची किंमत प्रतिक्विंटल 3300 करण्याची मागणी केली आहे. केंद्राने दिलेल्या कोट्यापेक्षा साखरेची विक्री कमी झाली आहे. तब्बल 124 कोटींची साखर गोडावूनमध्ये पडून आहे. व्याजाचा बोजा कारखान्यावर पडतोय. केंद्राकडून कारखान्यास 90 कोटी रुपये बफर स्टॉक व निर्यात अनुदान येणे आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिली आहे. त्याचे पैसे येणे बाकी आहेत. ऊस उत्पादकांना लवकरात लवकर उर्वरित रक्कम देऊ.'' राम पाटील, मकरंद करळे, धैर्यशील पाटील उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव 

loading image