दूध दरवाढीसाठी रासपचा विठ्ठलाला अभिषेक; आटपाडीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

दूध दरवाढीसाठी येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाने विठ्ठलाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले.

आटपाडी (जि. सांगली) : दूध दरवाढीसाठी येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाने विठ्ठलाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले. तहसीलदार सचिन लंगुटे यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. 

तीन महिन्यांपासून दुधाचे दर प्रति लिटर 12 ते 14 रुपये कमी झालेत. तर पशुखाद्याचे दर वाढत चाललेत. शासनाने दुधाला प्रति लिटर पंधरा रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, अशी बुद्धी शासनाला विठ्ठलाने द्यावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

आंदोलकांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून शासनाला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले. अनेक आंदोलकांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार सचिन लंगुटे यांना दूध दरवाढीसंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. 

तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे सुदाम जरग, अजित कटरे, उमाजी चव्हाण आदि युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rasap's anointing of Vitthal for milk price hike