मिरज तालुक्‍यात बंडाचे झेंडे; तरुणाईस संधी

प्रमोद जेरे
Friday, 12 February 2021

मिरज तालुक्‍यातील बावीस गावांपैकी पूर्व भागातील सरपंच आणि उपसरपंच निवडीत प्रस्थापितांना विजयी झालेल्या तरुण सदस्यांनी बंडखोरीची चुणूक दाखविली.

मिरज ः तालुक्‍यातील बावीस गावांपैकी पूर्व भागातील सरपंच आणि उपसरपंच निवडीत प्रस्थापितांना विजयी झालेल्या तरुण सदस्यांनी बंडखोरीची चुणूक दाखविली. बहुसंख्य गावांमध्ये नेतेमडंळीना तरुणाईस संधी द्यावी लागली. तर अनेक ठिकाणी नेतेमंडळीना तरुणाईनेच बऱ्यापैकी चकवा दिला. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाला आता फेरमांडणीचा विचार करण्यासह आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीस नेहमीचे चेहरे हटवुन नव्या पिढीस संधी द्यावी लागणार आहे.

तालुक्‍यातील बावीस गावांपैकी पंधरा गावे ही मिरज विधानसभा मतदार संघातील राजकारणाशी निगडीत आहेत. तर पश्‍चिम भागातील गावे ही सांगली विधानसभा मतदार संघातील राजकारणाशी सबंधित आहेत. मिरज विधानसभा मतदार संघाशी निगडीत गावांपैकी मालगाव, आरग, म्हैसाळ, एरंडोली, या मोठ्या गावांमध्ये मोठी चुरस होती. यापैकी मालगाव आणि आरगमध्ये मतदारांनी गावातील नेत्यांना खऱ्या अर्थाने सरळ केले.

विरोधी आणि सत्ताधारी गटांचे समान आणि एखादा अपक्ष असे अगदी काठावरचे बहुमत देऊन नेतेमंडळीची डोकेदुखी आधिकच वाढवली. मालगावमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीवेळी झालेले राजकारण नेत्यांची मती गुंग करणारे ठरले. सरंपचपदासाठी केलेली जुळणी उपसरपंचपदाच्या निवडणुकीत फिसकटते आणि उपसरपंच विरोधी पक्षाचा होतो हे कसे घडले आणि कोणामुळे घडले यावरुनही नजिकच्या भविष्यकाळात ब-यापैकी राजकारण गतीमान होणार आहे.

आरगमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे म्हणुन पंचायत समीती निवडणुकीत विजयी झालेल्या नेत्यांनेच ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षास पऱाभवाची धुळ चारली. एरंडोलीमध्ये तर सरपंचपदासाठी पात्र उमेदवार विरोधी गटातुन विजयी झाल्याने गटाने निवडणुकीवर बहिष्कार टाकुन पद रिक्त ठेवायचे नियोजन केले होते. पण कायदेशीर तरतुद ऐकुन लगेच सरपंचपद मिळवले. तालुक्‍यातील भोसे कळंबी आणि तानंग या तीन्ही गावांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या. 

म्हैसाळमधील फुटीने भाजप चिंतेत 
म्हैसाळमध्ये भारतीय जनता पक्षास एकतर्फी बहुमत मिळुनही सरपंचपदावरुन सत्ताधारी गटात निर्माण झालेली दुफळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सावधगिरीचा इशारा देणारी आहे. येथे केवळ मनोज शिंदे यांना पराभुत करण्यासाठी तिन गट एकत्र आले. पण सरपंचपदाच्या निवडणुकीत याच तिन गटांमध्ये पडलेली फुट भारतीय जनता पक्षासाठी आणि जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे यांच्यासाठी चिंता वाढविणारी आहे.

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebel flags in Miraj taluka; Opportunity for youth