दोन्ही कॉंग्रेसपुढे बंडखोरीचे आव्हान 

राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कोरेगाव -  पिंपोडे बुद्रुक गटात राष्ट्रवादीमध्ये, तर वाठार किरोली गटात कॉंग्रेसमध्ये बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले असून, उद्या (सोमवार) दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने तालुक्‍याच्या उत्तर भागात राष्ट्रवादीपुढे आणि दक्षिणेत कॉंग्रेसपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

कोरेगाव -  पिंपोडे बुद्रुक गटात राष्ट्रवादीमध्ये, तर वाठार किरोली गटात कॉंग्रेसमध्ये बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले असून, उद्या (सोमवार) दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने तालुक्‍याच्या उत्तर भागात राष्ट्रवादीपुढे आणि दक्षिणेत कॉंग्रेसपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

तालुक्‍याचा उत्तर भाग "राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पिंपोडे बुद्रुक गटामध्ये या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक होते. मंगेश धुमाळ, की लालासाहेब शिंदे, अशी प्रमुख नावे चर्चेत असताना अखेरच्या क्षणी मंगेश धुमाळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. परिणामी या ठिकाणी नव्याने पक्षांतर्गत राजकीय समीकरणांची मांडणी होऊ लागली. लालासाहेब शिंदे किंवा त्यांचे समर्थक बंडखोरी करणार का? अशी चर्चा सुरू झाली. त्या दृष्टीने घडामोडीही घडू लागल्याचे बोलले जाऊ लागले. राष्ट्रवादीच्या विरोधात या गटापुरती स्थानिक आघाडी करण्याच्या पर्यायावरही विचार सुरू झाला. त्यानुसार, गेल्या काही दिवसांत जोरदार हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे लालासाहेब शिंदे यांनी बंड करू नये, यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आज आणि उद्या दुपारपर्यंत नेमक्‍या कोणत्या घडामोडी घडणार? याकडे राजकीय गोटाचे लक्ष लागले आहे. 

तालुक्‍याच्या दक्षिण भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची ताकद जवळपास समान असल्याचे मानले जाते; परंतु यावेळी उमेदवार निवडीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसमध्ये रंगलेल्या गटा-तटाच्या राजकारणाने दक्षिण भाग ढवळून निघाला आहे. वाठार किरोली गटातून कॉंग्रेसने भीमराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जितेंद्र भोसले यांनी बंडखोरीचा पवित्रा घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार ठेवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने संभाजीराव गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, माजी उपसभापती कांतिलाल पाटील व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा गट नाराज असल्याची व ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यात यश न आल्यास दोन्ही कॉंग्रेसमधील नाराजांची मोट बांधली जाणार का? 

व त्याहीपुढे ही एकत्रित मोट जितेंद्र भोसले यांच्या पाठीशी राहणार का? की, श्री. भोसले यांनाच बंडखोरीपासून परावृत्त करण्यात कॉंग्रेस यशस्वी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rebel's challenge both congress