सातारा जिल्ह्यात विक्रमी पाऊस ; आजवर 17137 मिलिमीटरची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पावसाचे आगार समजले जाणाऱ्या नवजापेक्षाही सर्वाधिक 7631.1 मिलिमीटर पाऊस महाबळेश्‍वरला झाला आहे. 

सातारा : जिल्ह्यात पावसाने यावर्षी विक्रम केला असून, आजअखेर 17 हजार 137 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांची सरासरी पावसाने मोडली आहे. सरासरीच्या 1318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगार समजले जाणाऱ्या नवजापेक्षाही सर्वाधिक 7631.1 मिलिमीटर पाऊस महाबळेश्‍वरला झाला आहे. 
सातारा जिल्ह्यात पूर्वेकडील भागात दुष्काळ, तर पश्‍चिमेकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती आहे; पण यावर्षी दुष्काळाची तीव्रता ही गंभीर राहिली. त्यासोबतच पश्‍चिम भागात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा फटका पाटण, कऱ्हाड, सातारा, जावळी, वाई तालुक्‍यांना बसला. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्याचे सुमारे साडेतीनशे कोटींचे नुकसान झाले. मध्यंतरी पावसाने आठवडाभर उघडीप दिली. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून, पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणांतून पुन्हा एकदा पाणी सोडावे लागत आहे. यावर्षी पावसाने गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडला आहे. आजअखेर जिल्ह्यात 17 हजार 137 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या 1318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
तालुकानिहाय आजपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 1753.98, जावळी- 2260.90, पाटण- 2028.03, कऱ्हाड- 1003, कोरेगाव- 676.56, खटाव- 427.16, माण- 161.56, फलटण-190.56, खंडाळा 517.05, वाई- 887.66, महाबळेश्वर- 7631.1. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 17137, तर सरासरी 1318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

धरणांतील पाणीसाठा 
धरणातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि कंसात एकूण क्षमता. 
धोम 11.26 (13.50), धोम- बलकवडी 3.94 (4.08), कण्हेर 9.48 (10.10), उरमोडी 9.56 (9.96), तारळी 5.37 (5.85), नीरा- देवघर 11.73 (11.91), भाटघर 23.42 (23.75), वीर 9.41 (9.83). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record rainfall in Satara district