या जिल्ह्यात होईना अनुकंपाची भरती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

0 भरतीबाबत प्रशासनाची नकारघंटा?
0 परवानगी घेण्यासाठी फाइल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचा डाव
0 प्रशासन करतेय चालढकल
0 "सीईओं'चा राहिला नाही वचक

सोलापूर : जिल्ह्यात अनुकंपा भरती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची नकारघंटा दिसत आहे. राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये अनुकंपा भरती प्रक्रिया होत असताना सोलापुरात मात्र नकारात्मक चित्र दिसत आहे. ही भरती प्रक्रिया टाळण्यासाठी आता त्याला मंजुरीसाठीची फाइल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचा घाट जिल्हा परिषद प्रशासनाने घातल्याचे दिसून येते.

हेही वाचा...

aschim-maharashtra/navrdevacha-ukhana-video-242062">असा उखाणा तुम्ही ऐकलाय का?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सांगूनही सामान्य प्रशासन विभागाकडून काहीच हालचाल होत नाही. यावरून श्री. वायचळ यांचाच प्रशासनावर अंकुश नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अनुकंपा भरतीबाबतची बैठक ऑगस्ट महिन्यात झाली आहे. मात्र, अद्यापही त्यावर कसलीच कार्यवाही झालेली दिसत नाही. जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वाने जवळपास 51 जागा भरायच्या आहेत. ज्यांची नावे सेवाज्येष्ठता यादीत आहेत, त्यापैकी काहीजणांच्या वयांची मर्यादा पूर्ण झाली आहे. पण, अद्यापही ही भरती प्रक्रिया राबविली जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अनुकंपाने 51 लोकांची भरती केल्यास त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होणार आहे. पण, प्रशासनाला हे करण्यासाठी वेळ मिळत नाही का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. प्रशासनाने मनावर घेतले तर एका तासांमध्ये हा विषय मार्गी लागू शकतो. पण, त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाची भूमिका या 51 कुटुंबीयांच्या आशेवर पाणी फेरण्यासारखी असल्याचे या सगळ्या प्रक्रियेवरुन दिसून येते.

हेही वाचा...छेडछाड करणाऱ्यांना दामिनीची धास्ती

संघटनेची विभागीय आयुक्तांना विनंती
दरम्यान, पुणे विभागातील जिल्हा परिषदांमध्ये अनुकंपा भरती करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनने पुणे विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. शासनाने अनुकंपा भरतीसाठी परवानगी देऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. पण, पुणे विभागातील जिल्हा परिषदांमध्ये अद्यापही भरती झालेली नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरती करण्याच्या सूचना देण्याची विनंती संघटनेचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया ज्येष्ठता, पात्रता व समुपदेशनाने व्हावी. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान, सुलभ व पारदर्शक होईल, असेही संघटनेने त्या पत्रात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment of compassion in this district