'या' ठिकाणी आहेत घरोघरी सावळ्या रंगाच्या गणेशमूर्ती

महेश काशीद
Monday, 24 August 2020

धोंगडी आडनाव असलेल्या कुटुंबांत ही परंपरा आहे. 

बेळगाव : गणेशोत्सवात सावळ्या रंगाची श्रीमूर्ती पुजण्याची परंपरा बेळगावातील सोमवंशीय सहस्रार्जुन समाज (सावजी) जपत आहे. बेळगावातील गणेशोत्सवाला सुमारे ११५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. बेळगावातील विविध समाज गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात. काही समाजांतर्फे आगळ्यावेगळ्या धार्मिक परंपरा जपल्या जात असून त्यापैकी एक सोमवंशीय सहस्रार्जुन समाज आहे.

हेही वाचा - निपाणीत भाषेमुळे होतीये शेतकऱ्यांची कोंडी ; हे आहे कारण ? 

देशातील विविध शहरात सोमवंशीय सहस्रार्जुन समाज (सावजी) विखुरला असून बेळगावातही या समाजातील सुमारे १२ ते १३ हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. या समाजाकडून दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार या समाजाकडून गणेशोत्सवात सावळ्या रंगाच्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. धोंगडी आडनाव असलेल्या कुटुंबांत ही परंपरा असून या समाजातील चौधरी आडनाव असलेल्या कुटुंबामध्ये लाल रंगाची श्रीमूर्ती पुजली जाते.

स्वातंत्र्यलढ्याला जागृतीची जोड देण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्रानंतर १९०५ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या ११५ वर्षांत विविध मंडळे आणि समाजातही गणेशोत्सवाचा विस्तार झाला. यापैकी एक सोमवंशिय सहस्त्रार्जुन समाज आहे. त्यांनी घरगुती गणेशोत्सवात आगळीवेगळी परंपरा जपली आहे. यंदाही प्रत्येकाच्या घरी सावळ्या रंगाची श्रीमूर्ती पुजण्यात आली आहे. गोत्रप्रमाणे या स्वरुपाची श्रीमूर्ती पुजली जाते, असे समाजातील ज्येष्ठांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - वीज बिलाचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडू : हसन मुश्रीफ...

ठरावीक मूर्तिकारांनाकडेच ऑर्डर

सोमवंशिय सहस्त्रार्जुन समाजामध्ये ५ दिवसांचा गणपती असतो. समाजामध्ये सावळ्या रंगाच्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असून नेहमीच्या मूर्तिकारांकडून श्रीमूर्ती घेतली जाते. यामुळे अशा विशिष्ट श्रीमूर्तीबाबतची ऑर्डर वडगाव, शहापूर आणि वडगाव संभाजीनगरमधील मूर्तिकारांना दिली जाते. 

"बेळगावात गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली तेव्हापासून बेळगावातील सोमवंशीय सहस्रार्जुन समाज (सावजी) सावळ्या रंगाची श्रीमूर्ती पुजतो. समाजातील धोंगडी समुदाय सावळ्या रंगाची श्रीमूर्ती तर चौधरी समुदायाकडून लाल रंगाची श्रीमूर्ती पुजली जाते. या स्वरुपाची श्रीमूर्ती पुजणारा हा एकमेव समाज आहे."

- गिरीश धोंगडी, अध्यक्ष, 
(सोमवंशीय सहस्रार्जुन समाजप्रणित सावजी युवा मंच)

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the red and black color ganesh idol in belgaum