यंदाही द्राक्ष व्यापारी नोंदणीचा विषय रखडला ; दर कमी झाल्याने शेतकरी हतबल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

जिल्ह्यातील सुमारे 32 हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्ष बागांची लागण आहे.

सांगली : द्राक्ष हंगाम गेल्या महिन्यांपासून जोमाने सुरू झाला. अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या अफवा, निर्यातीवर आलेल्या मर्यादा या बाबींमुळे यंदा द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्यांना शोधायची वेळ आली आहे. यामुळे प्रत्येक वर्षीच व्यापाऱ्यांच्या नोंदणीचा विषय बाजूला पडला आहे. 

यंदाचा अवकाळी, अतिवृष्टी, धुके, कोरोना संकट, निर्यातीवरील अनुदान कपात, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून लॉकडाऊनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुलावर येवून ठेपली आहे. जिल्ह्यातील सुमारे 32 हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्ष बागांची लागण आहे.

सद्य:स्थितीत 25 टक्के बागांची विक्री झाली आहे तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे 25 टक्के माल खराब झाला आहे. उर्वरित पन्नास टक्के क्षेत्रातील बागा संकटात आहेत. शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष तोंडमिळवणी करताना फारच तारेवरची कसरत करावी लागते आहे. एप्रिल छाटणीपासून अडचणीना तोंड द्यावे लागते आहे. मालाची विक्री करतानाही कमी अधिक तशीच परिस्थिती आहे. 

हेही वाचा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लालपरीला ठरतोय घातक ; प्रवासी संख्येत घट -

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन तरीही...

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दोनच दिवसांपूर्वी लॉकडाऊनची अफवा पसरवून द्राक्ष मालाचे दर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतरही जिल्ह्यात द्राक्ष दरात फार सुधारणा झालेली नाही. पक्क माल सध्या 25 टक्के काढणीला आल्यामुळेही दरावर परिणाम झाला आहे. 

खर्चाची तोंडमिळवणी... 

एप्रिल छाटणीपासून हंगामावर कोरोना संकट आहे. अतिवृष्टी, अवकाळीमुळे खर्चात वाढ झाली. सध्या मिळणाऱ्या खर्चातून तोंडमिळवणी नव्हे तर घातलेली रक्कम तरी निघेल का याची चिंता शेतकऱ्यांना सध्या सतावतेय. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: registration of businessman of grapes sapling not done for this year in sangli