रुग्णसेवेस टाळाटाळ केल्यास नोंदणी रद्द : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

विष्णू मोहिते
Thursday, 6 August 2020

सांगली- खासगी रुग्णालयांनी उत्तरदायित्व ओळखून स्वतःहून सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज रुग्णसेवा नाकारल्यास संबंधित इस्पितळांच्या नोंदणीच रद्द केल्या जातील, असा निर्वाणीचा इशारा दिला. गेले काही दिवस रुग्णहेळसांडीच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार-संपादकांशी संवाद साधला. कोविड उपचार व्यवस्थेची माहिती दिली. 

सांगली- खासगी रुग्णालयांनी उत्तरदायित्व ओळखून स्वतःहून सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज रुग्णसेवा नाकारल्यास संबंधित इस्पितळांच्या नोंदणीच रद्द केल्या जातील, असा निर्वाणीचा इशारा दिला. गेले काही दिवस रुग्णहेळसांडीच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार-संपादकांशी संवाद साधला. कोविड उपचार व्यवस्थेची माहिती दिली. 

ते म्हणाले, ""कोविड उपचारांसाठी अंगीकृत खासगी रुग्णालयांनाही प्रशासन आवश्‍यक ते सर्व पाठबळ देत आहे. खासगी रुग्णालयांनीही रुग्ण उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून स्वत:हून रुग्ण सेवेसाठी पुढे यावे. संपूर्ण जग महामारीशी झुंजतेय अशावेळी जे कर्तव्य नाकारतील अथवा टाळाटाळ करतील अशा रुग्णालय प्रशासनांची नोंदणीच रद्द केली जाईल. अंगीकृत केलेल्या कोविड रुग्णांलयामध्ये बिल आकारणीबाबत पारदर्शकता असावी. बिलांबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उपस्थित होऊ नयेत. यासाठी बिल तपासणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक हॉस्पिटलला नियुक्त केले आहे.'' 

ते म्हणाले, ""कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या उपलब्ध असणाऱ्या बेड्‌सच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार असून, यासाठी इस्लामपूर, विटासारख्या शहरांमध्ये खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात येत आहेत. यावेळी जे कोविड बाधित रुग्ण रुग्णांलयांमध्ये ऍडमिट आहेत, त्यांची माहिती नातेवाइकांना मिळावी यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार आहे. प्रिस्क्रीप्शनवरील औषधे दुकानदारांकडून उपलब्ध होतीलच, पण किरकोळ आजारांवरील औषध विक्रीला ही कोणतेही बंधन नसेल.'' 
रुग्णालयांना ऑक्‍सिजन सिलिंडरची टंचाई जाणवत असल्याबाबत डॉ.चौधरी म्हणाले, ""कोरोनासाठीच्या कोणत्याच रुग्णालयांसाठी ऑक्‍सिजनचा तुटवडा नाही. पुरेशा प्रमाणात सिलिंडर आहेत. संपल्यास पुरवठादाराकडून अत्यंत अल्प काळात तो उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यामुळे भीतीचे कारण नाही.'' 

जिल्हाधिकारी म्हणाले-
0 खासगी कोविड रुग्णालयांनी नियमबाह्य बिले आकारल्यास कारवाई 
0 खासगीमधील बिलांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक 
0 ऍडमिट रुग्णांची नातलगांना माहिती देण्यासाठी रुग्णालयाबाहेर मदत टेबल 
0 इस्लामपूर, विट्यातही खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करणार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration canceled if patient service is delayed: Collector's warning