
कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीकरणाची रंगीत तालीम उद्या (ता. 8) सकाळी नऊ वाजता सांगली जिल्ह्यात तीन ठिकाणी केली जाणार आहे.
सांगली ः कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीकरणाची रंगीत तालीम उद्या (ता. 8) सकाळी नऊ वाजता जिल्ह्यात तीन ठिकाणी केली जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार त्याचे नियोजन करण्यात आले आहे. इस्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालय, कवलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सांगली शहरातील हनुमाननगर येथील मनपाच्या रुग्णालयात ही तालीम होईल. 25 रुग्णांना लसीकरण दिल्याची तालीम करून त्यासाठीची सज्जता सिद्ध केली जाईल.
कोरोनाच्या महामारीशी संघर्षात लसीकरणाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लसीकरण प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच लस दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला लस दिली जाणार आहे.
सुमारे 30 हजार जणांची त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, मेडिकल चालक, रुग्ण वाहिका चालक, अन्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांचा समावेश आहे. त्यांची ऑनलाईन नावनोंदणी करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे म्हणाले,""यातील 25 लोकांना प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण दिल्याची रंगीत तालीम शुक्रवारी होईल. लाभार्थीना एक एसएमएस पाठवले जाईल. तो त्याला पोहोचला का, हे पाहिले जाईल. रुग्ण तेथे आल्यानंतर त्याचे समुपदेशन केले जाईल. त्याचे आधार कार्ड पाहून तपासणी होईल. त्यानुसार त्यांना एसएमएसद्वारे एक नोंदणी क्रमांक मिळेल. त्यानुसार लस दिली जाईल. अर्धा तास देखरेखीखाली ठेवले जाईल.
काही त्रास होत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घरी पाठवले जाईल. प्रत्यक्षात कुणालाही थेट लस दिली जाणार नाही. ही फक्त रंगीत तालीम आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीकरण होईल, याची माहिती आमच्या यंत्रणेला होईल.''
संपादन : युवराज यादव