सांगलीत कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

विष्णू मोहिते
Saturday, 9 January 2021

कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम आज घेण्यात आली.

सांगली ः कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम आज घेण्यात आली. ही मोहीम दोन टप्प्यात राबवणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागात शासकीय व खासगी आरोग्य विभागाचे डॉक्‍टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आज रंगीत तालीम झाली.

कोरोना लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, कवलापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. आर. शितोळे, डॉ. भूपाल शेळके उपस्थित होते. 

सीईओ डुडी पुढे म्हणाले,""या लसीकरणाच्या पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर उभा करून देण्यात येणार आहे.'' 

रंगीत तालीमीमध्ये पहिल्या विभागात ऑनलाईन नोंदणी, दुसऱ्या विभागात आधार नोंदणीची सत्यता पडताळणी करून लस देण्याचे प्रात्यक्षिक तर तिसऱ्या विभागामध्ये रिकव्हरी रूमची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये संबंधित लाभार्थ्याला अर्धा तास थांबवून घेऊन त्यांना लसीकरणानंतर नियमितपणे कोरोनाबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणानंतर रुग्णास जर काही त्रास होत असेल तर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही करण्यात आली होती. ही लस घेतलेल्यांचे आधार लिकिंग होणार आहे. 

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात ड्राय रन 

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात ड्रायरनचा प्रारंभ प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. बी. कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांची उपस्थित होते.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rehearsal successful of corona vaccination in Sangli