गतिमंद मुलीवर अत्याचार; नराधम नातेवाईकास सक्‍तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

गतिमंद पीडित मुलीचे आई-वडील व एक भाऊ कामानिमित्त आठ सप्टेंबर 2017 रोजी बाहेर गेले होते. घरात तिच्यासह दोन बहिणी व छोटा भाऊ होता. काही वेळाने छोटा भाऊ किराणा दुकानात गेला. तेथे मित्राशी बोलत असताना, त्याची एक बहिण तेथे आली.

नगर : गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल जिल्हा न्यायालयाने तिचा नातेवाईक असणाऱ्या तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास 10 महिने सक्‍तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. गणेश रंगनाथ पाथरे (वय 35, रा. दौला वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

हेही वाचा- सर बेंबी ओढतात, चिमटे काढतात..! 

घटनेची माहिती अशी

गतिमंद पीडित मुलीचे आई-वडील व एक भाऊ कामानिमित्त आठ सप्टेंबर 2017 रोजी बाहेर गेले होते. घरात तिच्यासह दोन बहिणी व छोटा भाऊ होता. काही वेळाने छोटा भाऊ किराणा दुकानात गेला. तेथे मित्राशी बोलत असताना, त्याची एक बहिण तेथे आली. घरी नातेवाईक पाथरे आल्याचे, तिने भावाला सांगितले. त्यानंतर दोघे घरी आले असता, आतून दरवाजा बंद होता.

धक्का देऊन त्यांनी दरवाजा उघडला असता, आत गतिमंद मुलीवर पाथरे अत्याचार करीत असल्याचे त्यांना आढळून आले. हा प्रकार भावाने शेजारील काकांना सांगितला. त्यांच्या मदतीने पाथरे यास घरातच बसवून ठेवले. छोट्या भावाने फोनवर मोठा भाऊ व आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. आई-वडिलांनी पीडित मुलीसह भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले. तेथे छोट्या भावाच्या फिर्यादीवरून पाथरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. 

सहा साक्षीदार तपासले

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी पीडित मुलीचा छोटा भाऊ, आई, वैद्यकिय अधिकारी, शेजारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सर्व साक्षी-पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पाथरे यास दहा वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास 10 महिने आणखी सक्‍तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relative is sentenced to 10 years for rape on girl