कर्जमुक्तीचा लाभ 93 हजार शेतकऱ्यांना : पालकमंत्री जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने दोन लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज माफी करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. जिल्ह्यातील सुमारे 93 हजार 290 शेतकऱ्यांना सुमारे 722 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची गतीमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

सांगली : आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने दोन लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज माफी करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. जिल्ह्यातील सुमारे 93 हजार 290 शेतकऱ्यांना सुमारे 722 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची गतीमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. 

प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,""महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले व 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि अल्पमुदत पीक पुनर्गठित दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा आतापासूनच तयार करावा. दुष्काळी भागातील पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांना निश्‍चितपणे गती देण्यात येईल. जातीचे दाखले शाळेतच मिळावे यासाठीही मोहीम राबविण्यात येईल.'' 

मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, दलित मित्र, शिक्षक, नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी यांनी सूत्रसंचालन केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महापालिका 
महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती संदीप आवटी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्‍त सहदेव कावडे यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रशासनाने चांगले काम केले असून ते असेच पुढे सुरु ठेवावे, असे सांगितले. 

प्लास्टिक मुक्ती जागृती सायकलफेरी

जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्तीच्या प्रचारासाठी निघालेल्या कर्नाळ (ता. मिरज) येथील रोड स्पिन वॉरिअर्सच्या 21 सायकलपटूंनी संचालनात भाग घेतला. त्यांच्या सहभागाने सुरू झालेल्या "से टू नो प्लास्टिक' जागृतीचा प्रारंभ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)विजयसिंह जाधव, राहूल जाधव (सामान्य प्रशासन) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. ही रॅली प्रत्येक पंचायत समिती स्तरावर जाऊन प्लास्टिक मुक्तीची शपथ देऊन प्रचार करणार आहे. रविवारी या सायकलपटूंच्या पथकाने मिरज पंचायत समितीला भेट दिली. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंक 
अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, सरव्यवस्थापक बी.एम. रामदुर्ग, मानसिंग पाटील, व्यवस्थापक एस.एम. काटे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

वसंतदादा कारखाना व दत्त इंडिया कंपनी
अध्यक्ष विशाल पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. शाळा नंबर 12 व 24 चे विद्यार्थी उपस्थित होते. कारखाना सुरक्षा विभागाने मानवंदना दिली. उपाध्यक्ष सुनिल आवटी, संचालक अमित पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव प्रकाश पाटील, नागेश शिंदे, युनियनचे शंकर पाटील, प्रदीप शिंदे, हेमंत पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relief to 93 thousand farmers from agriculture : Jayant Patil