उदं गं आई उदं चा गजर थंडवणार: सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

जानेवारीतील यात्रेवरही कोरोनाचे सावट 
: मंदिर बंद ठेवण्याची शक्‍यता,

बेळगाव : केवळ माही नव्हे तर जानेवारीत होणारी सौंदत्ती रेणुका देवीची (यल्लम्मा) यात्राही रद्द होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आरोग्य खात्याने वर्तविली असून उपाययोजनांना सुरवात केली आहे. सध्या 1 जानेवारीपर्यंत सर्व सभा, समारंभ, उत्सवांवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यामुळे, पुढील महिन्यातही भाविकांना रेणुका देवीचे दर्शन मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. 

माही यात्रेला सौंदत्ती डोंगरावर केवळ महाराष्ट्रातील भाविक जाऊन देवीचे दर्शन घेतात. तर जानेवारीत होणाऱ्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील भाविकांची उपस्थिती असते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार बेळगाव तालुक्‍यातील प्रत्येक गावातील भाविक डोंगरावर सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम उरकतात. त्यासाठी डोंगरावर प्रत्येक गावची जागाही निश्‍चित आहे. यात्रा काळात भाविक सहकुटुंब डोंगरावर जाऊन वास्तव्य करतात. यात्रेत डोंगरावर लाखो भाविकांची उपस्थिती असते. अशा यात्रेच्या माध्यमातून सामूहिक संसर्गाचा धोका असल्याने जानेवारीत होणाऱ्या या यात्रेवर सध्या कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे, यंदा डोंगरावर पडल्या भरण्याचा सामूहिक कार्यक्रमही होणार नाही. 

हेही वाचा- बिबट्याची दहशत कायम: महिनाभराच्या विश्रांती नंतर केला बैलावर हल्ला -

लॉकडाउननंतर राज्यातील इतर मंदिरे खुली करण्यात आली असली तरी त्यातून सौंदत्ती रेणुका देवी मंदिराला वगळण्यात आले आहे. महाराष्ट्रानेही आपल्या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले आहेत. पण, महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवीचे मंदिर मात्र बंदच राहिले आहे. कोरोनाचा संसर्ग बेळगावात कमी झाल्याने डिसेंबरमध्ये मंदिर खुले होण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. पण, याच काळात देवीचा उत्सव असून त्यात परराज्यातील भाविकांची उपस्थिती अधिक असते. त्यामुळे, बेळगावात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरमध्ये दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने पाच लाखाहून अधिक भाविक देवीचे दर्शन घेतात. त्यामुळे, आरोग्य खात्यासमोर आव्हान ठरले असते. त्यातच आता दुसरी लाट येण्याची शक्‍यता असल्याने जानेवारीतही मंदिर बंद राहण्याची शक्‍यता अधिक आहे. 

"सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यामुळे जानेवारीत होणाऱ्या यात्रेचीही शक्‍यता धूसर झाली आहे. यात्रेचे आयोजन केल्यास लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येण्याची शक्‍यता असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अवघड ठरेल. त्यामुळे, जानेवारीतही मंदिर उघडण्याबाबत शंका आहे.' 
- रवी कोटारगस्ती, सीईओ, रेणुका मंदिर सौंदत्ती 

संपादन - अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renuka Devi Temple covid 19 festival stopped in belgaum