अबब...रेणुका हिच्या 3 वर्षात 13 सरकारी नोकऱ्या 

राजेंद्र कोळी
बुधवार, 11 डिसेंबर 2019

अबकारी खात्यात क्‍लार्क, पोलिस कॉन्स्टेबल, महिला व बालविकास खात्यात पर्यवेक्षिका, अल्पसंख्याक मोरारजी देसाई शाळेत संगणक ऑपरेटर, महानगरपालिकेत महसूल निरीक्षक, सांख्यिकी खात्यात निरीक्षक, नवोदय शाळेत शिक्षिका अशा अनेक पदावर त्यांची वर्णी लागली.

चिक्कोडी ( बेळगाव ) - आजच्या स्पर्धेच्या युगात एकेका नोकरीसाठी लाखो रुपये हाती घेवून फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. नोकरी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. तरीही एकही नोकरी मिळणे मुश्‍कील बनले आहे. अशा स्थितीत गरिबीवर मात करीत केवळ परिश्रमाच्या बळावर तीन वर्षात तब्बल 13 सरकारी नोकऱ्यांना पात्र ठरण्याचा मान संसुद्दी (ता. रायबाग) येथील रेणुका जोडट्टी या युवतीने मिळविला आहे. 

रेणुकाची घरची परिस्थिती गरीबीची आहे. तिने बारावी (पीयुसी) पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळा, महाविद्यालयात घेतले आहे. गरीबीमुळे थेट शाळेत शिकता न आल्याने तिने बहिस्त विद्यार्थी बनने पसंद केले. त्यातून डी. एड्‌., बी. व अर्थशास्त्रात एमए पदवी संपादन केली. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही, हे तिने वेळीच जाणले. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी रोज आठ-दहा तास सतत अभ्यास केला. तिच्या या अथक प्रयत्नांना यश मिळत गेल्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 13 नोकऱ्यांची संधी मिळाली. 

हेही वाचा - फोन आला, तुमचे खाते बँक बंद झाले आहे, अन्... 

अबकारी खात्यात क्‍लार्क, पोलिस कॉन्स्टेबल, महिला व बालविकास खात्यात पर्यवेक्षिका, अल्पसंख्याक मोरारजी देसाई शाळेत संगणक ऑपरेटर, महानगरपालिकेत महसूल निरीक्षक, सांख्यिकी खात्यात निरीक्षक, नवोदय शाळेत शिक्षिका अशा अनेक पदावर त्यांची वर्णी लागली. पण मोरारजी वसती शाळेतच नोकरी करण्यात तिने धन्यता मानली. मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, तसेच पुरुषांपेक्षा सरस असतात हे रेणुकाने प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. 

हेही वाचा - छेडछाडीतून इचलकरंजी येथे तरुणाचा निर्घृण खून 

सुशिक्षित बेरोजगारांसमोर आदर्श 

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. नोकरीअभावी त्यांच्यावर नैराश्‍याची वेळ आली आहे. पण आपल्या शिक्षणानुसार योग्य मार्ग दिसत नसल्याने समोर अंधार दिसत आहे. मात्र रेणुका हिने सुशिक्षित बेरोजगारांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. 

घरच्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी नोकरीशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी मन लावून अभ्यास केला. त्याला यशही मिळत गेले. प्रयत्न केल्यास काहीही साध्य होऊ शकते, याचा अनुभव आपणास आला. 
- रेणुका जोडट्टी, 
संसुद्दी, ता. रायबाग  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renuka Jodatti Does 13 Government Jobs In Three Years