Murder Of Youth In Ichalkaraji
Murder Of Youth In Ichalkaraji

छेडछाडीतून इचलकरंजी येथे तरुणाचा निर्घृण खून

इचलकरंजी ( कोल्हापूर ) - तरुणीचा पाठलाग करून त्रास देत असल्याच्या कारणातून दीपक महादेव कोळेकर (वय २८, रा.लक्ष्मी वसाहत, कोरोची) याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. येथील ईदगाह मैदान परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हातकणंगले परिसरातून सात जणांना अटक केली. 

यातील दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन तलवारीची मूठ, रक्ताने माखलेला चाकू ताब्यात घेतला आहे. अटक केलेल्यांमध्ये अक्षय सावंता नरळे (वय १९), मेहबूब इस्माईल उकली (१९), आदिनाथ अनिल बावणे (२३), सुनील आनंदा वाघवे (२०), कासिम अब्दुल नदाफ (२१), आकाश संजय वासुदेव (२७), सागर विठ्ठल आंबले (२६, सर्व रा. भोने माळ, इचलकरंजी) आदींचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी

दीपक हा एका तरुणीचा पाठलाग करीत होता. संबंधित तरुणी शहरातीलच एका महाविद्यालयात शिकते. याबाबतची माहिती तरुणीने घरी दिली होती. त्यानंतर तरुणीच्या नातेवाइकांनी दीपकला समज दिली होती; तरीही दीपक संबंधित तरुणीचा पाठलाग करुन त्रास देत होता. तरुणीच्या नातेवाईक असलेल्या संशयितांनी आपल्या साथीदारांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे सर्वांनी दीपकला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. दीपक नेहमीप्रमाणे सायंकाळी ईदगाह मैदानाजवळील चहा टपरीवर गेला होता. तेथे संशयितांनी त्याला गाठून जाब विचारत त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोकीवर तलवार व चाकूने वार केले. तो खाली कोसळल्यानंतर डोकीत दगड घातला. यामध्ये दीपक रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाला.

घटनेनंतर संयशित पसार

या परिसरात नेहमी वर्दळ असते. आकस्मिक घडलेल्या या प्रकाराने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. थोड्याच वेळात शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दीपकचा मृतदेह आयजीएम रुग्णालयात हलविला. रुग्णालयात दीपकच्या नातेवाइकांसह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. घटनेनंतर संयशित तेथून पसार झाले. पोलिसांना संशयितांची नावे समजल्यानंतर अवघ्या तासाभरात हातकणंगले परिसरातून त्यांना जेरबंद केले. पोलिस कर्मचारी उदय पाटील व प्रशांत ओतारी यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तरुणीचा पाठलाग करुन दीपक त्रास देत असल्याचे कारण पुढे आले. घटनास्थळी तलवारीची मूठ व गटारीत चाकू पडला होता. पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत. अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे तपास करीत आहेत.

टोळीयुद्धाची चर्चा

दीपकचा खून टोळी युद्धातून झाल्याची प्राथमिक चर्चा होती. शहरात दोन टोळ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. त्यातून त्याची ‘गेम’ झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

रेकॉर्डवरील गुन्हेगार

मृत दीपकवर यापूर्वी खुनी हल्लाप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा नोंद आहे. तो अविवाहित होता. तो पूर्वी केबल कामगार होता. संशयितांपैकी वासुदेव व आंबले यांच्यावरही खुनाचा प्रयत्न व मारहाणीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका संशयिताने आपल्या मोबाईलवर स्टेटसला हातात हत्यार घेऊन फोटो ठेवला होता. त्याचीही जोरदार चर्चा सुरू होती.

परिसरातील दुकाने बंद

वर्दळीच्या ठिकाणी थरारकपणे हल्ला झाला. त्यानंतर अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकाराने भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पटापट दुकाने बंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com