'संतांचे विचार कालसुसंगत मांडणाऱ्या संशोधनाची गरज' 

राजाराम ल. कानतोडे 
बुधवार, 18 जुलै 2018

मी 1947 ते 2004 या काळातील अभ्यास झालेल्या अठराशे मराठीच्या प्रबंधांची सूची तयार केली आहे. त्यात संतसाहितासंबंधी सुमारे 90 संशोधन प्रबध मला आढळून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या क्रमाने संशोधन झालेले दिसते. संतसाहित्यात सर्वाधिक प्रबंध ज्ञानेश्‍वर, तुकाराम आणि नामदेवांवर झालेले आहेत.  

जागतिकीकरणाने माणसांमध्ये तुटलेपणाची भावना आली आहे. एकमेकांप्रती ओलावा कमी झाला आहे. आत्मकेंद्री आणि भोगवादी समाजात स्वस्थ, सदाचार आणि नीतीमुल्यांची रुजवणूक करण्यासाठी संतांचे वाड्‌मय महत्वाचे आहे. संत विचार कालसुसंगत मांडणाऱ्या संशोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. आर. गायकवाड यांनी केले. 

आषाढी एकदशीनिमित्त संत वाड्‌मयाचा अभ्यास आणि संशोधनयाविषयी ते सकाळशी बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून 2004 - 05 पर्यंत राज्यातील विद्यापीठांमध्ये झालेल्या "मराठी विषयांच्या संशोधनाची वर्णनात्मक सूची' डॉ. डी. आर. गायकवाड यांनी तयार केली आहे. ते सध्या दयानंद महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. संतसाहित्याची उपयुक्तता मांडताना मराठी भाषेच्या दुरवस्थेची सल त्यांनी मांडली. 

संतसाहित्याच्या अभ्यास करून संशोधनात्म मांडणी करण्याकडे 1990 नंतर विद्यार्थ्यांचा कल घटल्याचे सांगून ते म्हणाले, ""संत साहित्याकडे नव्याची पाहण्याची गरज आहे. संतांनी मांडलेले अक्षर वाड्‌मय जीवनातील सार्वत्रिक सत्याचे तत्त्वज्ञान मांडते. जाती व्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर, वाढत्या लोकसंख्येवर, पर्यावरण संवर्धनावर भाष्य केले आहे. हिंसेला विरोध आणि विषमतेवर संतांनी प्रहार केला आहे. शांती, विकास, सदाचाराचे तत्त्वज्ञान मांडत संतसाहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे. ते आपण नीट समजून घेत नाही. त्यामुळे मराठी आणि पर्यायाने संत साहितयाबाबत उदासीनता दिसते.'' 

विद्यार्थ्यांचा मराठी भाषा आणि संतसाहित्यावर संशोधन करण्याचा ओढा कमी होत असल्याची सल मांडून श्री. गायकवाड म्हणाले, "" मराठीच्या वर्गात 1988 मध्ये 50 मुले असायची. आता त्याच्या निम्मीही दिसत नाहीत. जागतिकीकरणाने स्थानिक बोलीभाषेचे सपाटीकरण झाले आहे. संत वाड्‌मय अवघड असल्याचा गैरसमज एकीकडे काहीजण पसरवितात तर दुसरीकडे कशाला शिकायची मराठी असेही हेटाळणीच्या स्वरात काहीजण म्हणतात. मराठी भाषेकडे काहीजण तुच्छतेने पाहतात, हे दुर्दैवी आहे. समाजविकास आणि समाजस्वस्थासाठी हे मूलभूत साहित्य आपण पुन्हा नीट समजून घेण्याची वेळ आली आहे.'' 

सरकारने विद्यापीठाला निधी देणे गरजेचे 
राज्यात केवळ सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा विभाग नाही. विद्यापीठाने तो चालू करायचे ठरविले तरी आर्थिक अडचणी आहेत. सरकारने मराठी भाषेच्या विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. पंढरपूरला दक्षिणेची काशी म्हणतात. महानुभव पंथाची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. जिल्ह्यात अनेक संत होऊन गेले आहेत. त्यामुळे विद्यापीठात संतपीठ आणि संतांच्या विचारांचा अभ्यास करणारी अध्यासने निर्माण होणे गरजेचे आहे. निधीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांनी प्रयत्न करायला हवेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणीस, कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्या मदतीने आम्ही या सगळ्यात बदल व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहोत.'' 

मी 1947 ते 2004 या काळातील अभ्यास झालेल्या अठराशे मराठीच्या प्रबंधांची सूची तयार केली आहे. त्यात संतसाहितासंबंधी सुमारे 90 संशोधन प्रबध मला आढळून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या क्रमाने संशोधन झालेले दिसते. संतसाहित्यात सर्वाधिक प्रबंध ज्ञानेश्‍वर, तुकाराम आणि नामदेवांवर झालेले आहेत.  

Web Title: research on sant literature