कुपवाडला वीजेचे खांब न काढताच रस्ते रुंदीकरण  

ऋषिकेश माने
Thursday, 17 December 2020

वसंतदादा सूतगिरणी चौकातून कुपवाड जकात नाका मार्गावर सुरू असणारे रस्ते रुंदीकरणाचे काम नियोजन शून्य पद्धतीने सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रुंदीकरणाचा दर्जा बिघडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कुपवाड : वसंतदादा सूतगिरणी चौकातून कुपवाड जकात नाका मार्गावर सुरू असणारे रस्ते रुंदीकरणाचे काम नियोजन शून्य पद्धतीने सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रुंदीकरणाचा दर्जा बिघडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सुतगिरणीहून कुपवाडच्या जकात नाक्‍याकडे जाणारा रस्ता हा अरुंद स्वरूपाचा होता. त्यातच मध्यभागी पथदिव्यांची केलेली उभारणी अडचणीची ठरत होती. वाहनांचे असंख्य अपघात मार्गावर घडले आहेत. याची गंभीर दखल नागरिकांनी घेतली. रुंदीकरणा बाबतचा पाठपुरावा नगरसेवकांकडे करण्यात आला. प्रस्ताव दाखल करून साधारण वर्षभरापुर्वी ते सुरू करण्यात आले. आज ते अतिशय नियोजन शून्य आणि धीम्या गतीने सुरू आहे. महापालिका प्रशासन याची दखल घेत नाही. 

रुंदीकरण रस्त्यालगत अडथळा ठरणारे वीजेचे खांब न काढताच सुरू आहे. कुपवाड औद्योगिक क्षेत्राकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने या कामाची नागरिकांना गैरसोय होते. रूंदीकरण कामात अडथळा ठरणारे वीजेचे खांब प्रथम प्राधान्याने काढावेत या व्यक्त होणाऱ्या मागणीकडे संबीधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.यासाठी रुपये एक कोटी ऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीमध्ये वसंतदादा सुतगिरणी जवळील ओढा पात्र ते कुपवाडच्या संत रोहिदास चौका पर्यत रस्त्याचे रूंदीकरण, दुभाजक आणि डांबरीकरणाचा समावेश आहे. नियोजनबद्ध रुंदीकरणाद्वारे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.

परंतू सध्याच्या महावितरण-महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सुरळीत रुंदीकरणाचा प्रश्न अडलेल्या स्थितीत आहे. वीजेचे खांब स्थलांतरीत केलेला प्रस्ताव महावितरण कार्यालयात दाखल आहे. इकडे वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच आहे. महत्वाच्या आणि गंभीर प्रश्ना बाबत चालढकलपणा दाखवत प्रशासकीय अधिकारी वेळकाढूपणाचे धोरणाचा अवलंब करत आहेत. या नियोजन शून्य कामाबद्दल शहरातील सुज्ञ नागरिकांतून आक्षेप व्यक्त होत आहे. 

रुंदीकरणापूर्वी रस्त्याचे मार्कींग करणे गरजेचे होते. विद्युत पोलचे स्थलांतर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या असणाऱ्या हातगाड्याचे नियोजन केलेले नाही. रस्त्याच्या मधोमध असणारी पाणीपुरवठ्याची पाईप बाजूने टाकण्याऐवजी तशीच आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या कारभारामध्ये लक्ष घालावे. 
- राजेंद्र पवार, व्यापारी महासंघ उपाध्यक्ष, (सांगली, मिरज, कुपवाड)

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road widening without removing electricity poles to Kupwad