esakal | रस्ते होताहेत चकाचक; पण सुविधांची वानवा,.. कुठे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

 The roads are shiny; But the lack of facilities in Sangali

महापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित उपनगरे मुलभूत सेवा-सुविधांपासून कोसो मैल दूर असली तरी रस्त्यांबाबत सुखी आहेत.

रस्ते होताहेत चकाचक; पण सुविधांची वानवा,.. कुठे वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित उपनगरे मुलभूत सेवा-सुविधांपासून कोसो मैल दूर असली तरी रस्त्यांबाबत सुखी आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले रस्ते मार्गी लागले आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय होत आहेच; शिवाय दळणवळणाच्या सोयीही वाढल्या आहेत. वृंदावन व्हिलाज, धामणी रोड परिसरातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कुंभार मळा परिसरात या रस्त्याचे काम वेगाने सुरु लागल्याने सांगली-मिरज अंतरही आता मिटणार आहे. 

शहरातील दुर्लक्षित उपनगरात रस्त्यापासून ते ड्रेनेजपर्यंतचे प्रश्‍न कित्येक वर्षे रखडले आहेत. नागरिकांनी रस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून मागणी करुनही रस्ते होत होते. गत पाच वर्षात मात्र या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याचे चित्र आहे. मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरणामुळे रस्त्यांनी कात टाकली आहे. आमदार फंडासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा परिषद निधीतून होणारे रस्ते दर्जेदार तसेच प्रशस्त बनत आहेत. सांगलीतील बहुतांश उपनगरात आज रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीत अडकली आहेत. 

पावसाळ्यात रस्त्याअभावी लोकांची होणारी गैरसोय ध्यानात घेत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने कामे मार्गी लावण्यावर भर दिला आहे. प्रामुख्याने शामरावनगर, संजयनगर, अभयनगर, कारखाना परिसर, धामणी रस्ता, विश्रामबाग, विजयनगर परिसरातील चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक पावसाळ्यात त्रस्त बनले होते. चिखल, पाण्यातून वाट काढताना नागरिकांची पुरेवाट होत होती. मोकळ्या प्लॉटवरील पाणी रस्त्यावर साचल्याने त्यातून मार्गक्रमण करताना नरकयातनांचा अनुभव येत होता. पाणी निचऱ्याची कोणतीही सोय नसल्याने ड्रेनज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सर्रास चित्र होते. एकट्या शामरावनगरात सुमारे 10 हजार नागरिकांना चिखलमय रस्त्यातून ये-जा करावी लागत होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचेही आता डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. 

सांगली-मिरज अंतर 7 किमी 
विजयनगर जिल्हा न्यायालय परिसरातील हसनी आश्रम, कुंभार मळा, स्फूर्ती चौकातून दक्षिणेकडे जाणारा रस्ता शामरावनगरातील खिलारे मंगल कार्यालयासमोरुन कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीपर्यंत होणार आहे. मिरजेतील समतानगर परिसरापर्यंत हा रस्ता असल्यामुळे सांगली-मिरज हे अंतर अवघ्या सात किलोमीटरवर येणार आहे. वृंदावन व्हिला परिसरात हे काम गतीने सुरु आहे. सांगलीसह, कुपवाड, मिरजेतील नागरिकांना कोल्हापूरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग ठरेल. तसेच मुख्य रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताणही काहीअंशी कमी होणार आहे.

संपादन : युवराज यादव 

loading image