"व्हॉट्‌सऍप'वर मैत्रीचा बहाणा, लागला 65 हजार रुपयांचा चुना 

सतीश वैजापूरकर
Wednesday, 15 January 2020

एका बाजूला फसविले गेल्याचे दुःख, दुसरीकडे मित्राने पळविलेल्या लॅपटॉपमधील माहितीचा गैरवापर तर होणार नाही ना, याची भीती! विमनस्क अवस्थेत अभियंत्याने येथील पोलिस ठाणे गाठले. ठकसेनाच्या विरोधात तक्रार दिली नि पुन्हा घरचा रस्ता धरला.

शिर्डी : "व्हॉट्‌सऍप'वर झाली मैत्री. मध्य प्रदेशातील तरुण अभियंत्याला चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर देणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी हा अभियंता शिर्डीत आला. नोकरी राहिली दूर, तथाकथित व्हॉट्‌सऍप मित्राने त्याला तब्बल 65 हजारांचा चुना लावून गुंगारा दिला.

ठळक बातमी- पारनेरचा कचरा अडकला जागेचा वादात 

एका बाजूला फसविले गेल्याचे दुःख, दुसरीकडे मित्राने पळविलेल्या लॅपटॉपमधील माहितीचा गैरवापर तर होणार नाही ना, याची भीती! विमनस्क अवस्थेत अभियंत्याने येथील पोलिस ठाणे गाठले. ठकसेनाच्या विरोधात तक्रार दिली नि पुन्हा घरचा रस्ता धरला. व्हॉट्‌सऍपवरील मैत्री त्याला नवा धडा शिकवून गेली. 

व्हॉट्‌सऍपवर झाली मैत्री

राघवेंद्रसिंग भदोरिया असे या अभियंता तरुणाचे नाव. भोपाळ (मध्य प्रदेश) येथील एका कंपनीत तो नोकरी करीत होता. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून त्याची विजयादित्य सिंग नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. व्हॉट्‌सऍपवर त्याने आपण मुंबई येथील उद्योजक असल्याचे सांगितले. त्यांच्यात व्हॉट्‌सऍपद्वारे चांगली मैत्रीही झाली.

वाढीव पगाराच्या नोकरीचे आमिष

काही दिवसांनी या अभियंत्याला त्याने वाढीव पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले. "मी शिर्डीला येत आहे, त्या वेळी तू मला भेट. तेथे चर्चा करू. तुला लगेच वाढीव पगाराची नोकरी देतो,' असे आश्वासन त्याने व्हॉट्‌सऍपवरच दिले. त्यानुसार अभियंता भदोरिया शिर्डीत आला. दोघांची एका हॉटेलच्या रूमवर भेट झाली. सविस्तर चर्चा झाली. चांगली नोकरी मिळेल, या आशेने भदोरिया यांनी त्या तथाकथित उद्योजकासाठी 25 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी भेट म्हणून आणली होती.

ठकसेनाने पोबारा केला

चर्चा सुरू असतानाच, अभियंता बाथरूममध्ये गेला. ही संधी साधून त्या ठकसेनाने अभियंत्याचा नोकरी करीत असलेल्या कंपनीचा लॅपटॉप, अडीच हजार रुपयांची रोकड व भेट म्हणून आणलेली सोन्याची अंगठी, असा सुमारे 65 हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. 

हेही वाचा- साईबाबा जन्मस्थानावरून वाद पेटला 

तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

मैत्रीत दगा झाल्याने धक्का बसलेला तो अभियंता पोलिस ठाण्यात गेला. मात्र, तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करू लागले. त्यात त्याचा एक दिवस वाया गेला. नंतर त्याने पत्रकार ऍड. सागर हिवाळे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना संपर्क केला. त्यानंतर सोमवारी (ता. 13) त्याची तक्रार दाखल झाली. तत्पूर्वीच त्या ठकसेनाने आपले तिन्ही मोबाईल क्रमांक स्वीचऑफ केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbed one by whats app friendship marathi news