दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार ; दुकान मालकाच्या सतर्कतेमुळे फसला दरोड्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

बिल देण्याचा बनाव करत अचानकपणे दुकानात शिरले  व त्यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडली

बेळगाव - हवेत गोळीबार करत  तिघा संशयित दरोडेखोरांनी  स्टेशनरी दुकानात दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शुक्रवार (ता. 22) रात्री साडेनऊच्या सुमारास मठ गल्ली येथील चेतना स्टेशनरी मार्टमध्ये  ही घटना घडली. संशयितांनी  दुकान मालक  राकेश रूपचंद जैन (रा. समाचार भवन नरगुंदकर भावे चौक)  यांच्या डोक्यात पिस्तूलच्या उलट्या बाजूने हल्ला केल्याने  ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी,  राकेश जैन यांचे मठ गल्ली येथे  चेतना स्टेशनरी मार्ट नावाचे दुकान आहे.  काल नेहमीप्रमाणे दिवसभर दुकान सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास  दुकान मालक जैन व त्यांचे कर्मचारी असे चौघेजण दुकानात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेले तिघे जण त्यांच्या दुकानासमोर थांबले. त्यापैकी दोघेजण  खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले  तर एकटा मोटरसायकलवरच थांबला होता. खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोघांनी  जैन यांच्याकडे बिस्कीट आणि इनो पाकीट देण्याची मागणी केली. जैन यांनी  साहित्य दिल्यानंतर बिल देण्याची मागणी केली. त्यावेळी दोघेही बिल देण्याचा बनाव करत अचानकपणे दुकानात शिरले  व त्यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे  दुकान मालक जैन यांच्यासह  कर्मचार्‍यांची देखील घाबरगुंडी उडाली. संशयित पैसे लुटण्यासाठी  दुकानातील कॅश काउंटरकडे जात असताना जैन यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी  पिस्तूलच्या उलट्या बाजूने जैन यांच्या डोक्यात वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. संशयितांच्या ताब्यातून आपला बचाव करून घेण्यासाठी व त्यांना हुसकावून लावण्यासाठी  जैन यांनी काऊंटर वरील साबणाचा बॉक्स  संशयितांच्या  अंगावर फेकला. त्यामुळे  दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या  संशयितांनी काळोखाचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यानंतर जखमी जैन यांना   उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री घडलेल्या घटनेची माहिती  मार्केट पोलिसांना समजताच  मार्केट उपविभागाचे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त  चंद्रप्पा, पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हवनावर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी  धाव घेऊन  पंचनामा केला.

हे पण वाचामंगलकार्यालयातून सहा तोळ्याचा सोन्याचा हार लंपास

 

शहरातील मुख्य बाजारपेठेत  ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन  या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले  तिघेही तरुण  28 ते 30 वयोगटातील  असल्याचे  पोलिसांनी सांगितले.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery belgaum police market yard