esakal | मिरजमध्ये बोगस डॉक्‍टरांकडून लूटमार 
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery by bogus doctors in Miraj

मिरज शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात रुग्णांची लूटमार करणारी टोळकी मोठ्या संख्येने तयार झाली आहेत.

मिरजमध्ये बोगस डॉक्‍टरांकडून लूटमार 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली) : शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात रुग्णांची लूटमार करणारी टोळकी मोठ्या संख्येने तयार झाली आहेत. याबाबत पोलिसांकडून गुन्हेच दाखल होत नसल्याने या टोळक्‍यांचा आत्मविश्वास दिवसागणिक वाढतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे लाखो रुपयांची लूटमार करणाऱ्या टोळक्‍यांविरुद्ध एकही गुन्हा दाखल होत नाही याबाबतचे रहस्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाच शोधावे लागणार आहे. 

शहराचा वैद्यकीय लौकिक वाढत चालल्याने सध्या मिरज शहरात मिरजेच्या ग्रामीण भागासह कर्नाटक, कोकणातून हजारो रुग्ण येत असतात. यापैकी बहुसंख्य रुग्ण हे एसटी बसने येत असल्याने या टोळ्यांचा वावर आणि त्यांची फसवणूक करणारी केंद्रे याच परिसरातील गल्ली बोळात आहेत. बसस्थानकातून वृद्ध किंवा ग्रामीण भागातील रुग्ण बाहेर पडताना दिसला की टोळक्‍यातील तरुण या रुग्णाचा पाठलाग करून त्याची ओळख असल्याचे भासवून त्याच्याकडील फाईल वगैरे पाहण्याचे नाटक करतात.

त्यानंतर या रुग्णास मार्केट रस्त्यावरील एखाद्या बोळात असलेल्या एका बोगस औषधांच्या दुकानात नेले जाते. या ठिकाणी एखादा तरुण आणि तरुणी पांढरे कोट घालून बसलेले असतात. रुग्ण आणि त्याच्यासोबतच्या नातेवाईकास त्यांच्या ताब्यात सोपविले जाते. तेथे या रुग्णाची विचारपूस करून त्याची फाईल वगैरे तपासण्याची नाटके होतात. त्यानंतर रुग्णास काळजी करू नका तुम्हाला या रोगातून कायमचे मुक्त करू, असे सांगून जडी बुटीसारखी दिसणारी निव्वळ बोगस झाडपाल्यासारखी औषधे दिली जातात.

ज्यामध्ये बहुसंख्यवेळेस वेदनाशामक गोळ्यांची पावडर किंवा अन्य घातक औषधांचाही समावेश असतो. ही औषधे दिल्यानंतर लगेचच रुग्णाकडे जेवढे पैसे असतील तेवढे काढून घेतले जातात. त्यानंतर कमी पडल्याचे सांगून फोन पे किंवा अन्य मार्गाने निघतील तेवढे पैसे काढून घेतले जातात. 

ही फसवणूक केवळ तरुणच नव्हे तर याच परिसरात रस्त्यावर कंगवे किंवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांकडूनही होते. याच परिसरातील काही विक्रेत्या महिलाही लूटमारीच्या टोळीत सहभागी आहेत. या महिलाही येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य वाटसरुस किंवा पादचाऱ्यास बोलावून घेतात आणि त्यालाही तुम्हाला काही तरी गंभीर आजार आहे. डोळ्याकडेला काळी वर्तुळे आहेत.

तोंडावर डाग आहेत यासह अनेक कारणे सांगून त्यालाही लूटमारीच्या उपचारांसाठी याच बोगस डॉक्‍टर आणि औषधांच्या दुकानात नेऊन सोडतात. हे सगळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. केवळ तक्रारी दाखल होत नसल्याने या लूटमारीकडे होणारे दुर्लक्ष मिरजेसारख्या लौकिक प्राप्त वैद्यकीय नगरीस धोकादायक ठरणारे आहे. 

पोलिसांनी या टोळीचा छडा लावावा

रुग्णांच्या लुटमारीचे प्रकार आम्हालाही समजले आहेत.खरेतर याबाबत पोलिसांनी सतर्क राहून या टोळीचा छडा लावावा.अन्यथा मिरजसारख्या वैद्यकीय नगरीच्या लौकिकास धक्का लागु शकतो. 

- डॉ. शशिकांत दोरकर, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन, मिरज 

संपादन : युवराज यादव

loading image