निपाणीत बंद घर फोडून दीड लाखांसह सव्वा तोळे दागिन्याची चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

घरात कोणी नाही ही संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरही असलेल्या घराचे कुलूप तोडून दोन तिजोरी आणि कपाट उचकटले.

निपाणी ( बेळगाव ) - बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख दीड लाखासह सव्वा तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना निपाणी येथील चव्हाणवाडी मध्ये बुधवारी (ता. १८) पहाटे उघडकीस आली. गजानन खापे यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ते मेव्हण्याच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अशी, येथील मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे सेक्रेटरी व रिक्षा चालक गजानन खापे हे आपले पाहुण्यांच्या लग्नासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे सोमवारी (ता. १६) सहकुटुंब गेले होते. या वेळी घरात त्यांच्या आई होत्या. पण मंगळवारी रात्री त्या गजानन यांच्या भावाकडे रहायला गेल्या होत्या. घरात कोणी नाही ही संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरही असलेल्या घराचे कुलूप तोडून दोन तिजोरी आणि कपाट उचकटून त्यामधून एक तोळ्याची चेन आणि पाच ग्रॅम अंगठी, रोख एक लाख ५० हजार रुपये लंपास केले.

हेही वाचा - बापाचे डोळेच बोलले... मुलगा माझा कर्तृत्ववान !

विमा रक्कम भरण्यासाठी जमा केलेली रक्कम चोरीस

गजानन खापे हे मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे सचिव असल्याने त्यांनी सर्वशिक्षा व्यावसायिकांचे विमा भरण्यासाठी सुमारे सव्वा लाखाची रक्कम एकत्र केली होती. लग्न आटोपून आल्यानंतर बुधवारी ही रक्कम प्रादेशिक वाहतूक खात्याला भरली जाणार होती. चोरट्यांनी घरातील दोन्ही तिजोऱ्यांचे दार मोडून कपाटही उचकटले. पहाटे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना या घटनेची कल्पना आल्याने त्यांनी तात्काळ खापे यांच्याशी संपर्क साधला. आज सकाळी सहा वाजता निपाणी येथे येऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली. प्राथमिक  माहितीनुसार  दिड लाख रुपये आणि सव्वा तोळ्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील सर्व मंडळी आल्यानंतर नेमकी किती चोरी झाली आहे, हे समजणार आहे. घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हाडकर व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली

हेही वाचा - कैदी चालविणार आता बीपीओ केंद्र 

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery In Gajanan Khape Closed House In Nipani