चोरट्यांनी युनियन बॅंकेवर दरोडा टाकला पण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

धामोड(कोल्हापूर) : येथील युनियन बॅंकेच्या शाखेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीच्या रूममध्ये प्रवेश केला. मात्र तिजोरी उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. यामुळे बॅकेतील 2 कोटी 68 लाखांचे सोने कर्ज तारण आणि 16 लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बॅंकेत सीसीटीव्ही यंत्रणा, आणि सुरक्षारक्षक नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच युनियन बॅंकेपासून शंभर फूटावरील जिल्हा बॅकेच्या शाखेचेही चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

हे पण वाचा -  चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक... 

येथील मध्यवर्ती बाजार चौकात युनियन बॅंक व जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी युनियन बॅंकेचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. आज सकाळी आठ वाजता बॅंकेचे जागा मालक राजू आळतेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबतची माहिती त्यांनी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक कुमुद भारद्वाज यांना दिली. शाखा व्यवस्थापकांनी राधानगरी पोलिसांना याची वर्दी दिली. पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी आज सकाळी अकरा वाजता घटनास्थळाला भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याबाबत श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले.
चोरट्यांनी युनियन बॅंकेच्या बाहेरील सायरनच्या वायरी कापल्या. मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेत असलेल्या पर्यायी चावीच्याद्वारे तिजोरी चोरट्यांनी उघडली. परंतु खुप प्रयत्न करूनही मुख्य सोने आणि रोकड ठेवलेले लॉकर्स उघडण्यात चोरट्यांना अपयश आले. त्यामुळे तिजोरीतील कर्जासाठी दिलेले सोने तारण 2 कोटी 68 लाख व 16लाखांची रोकड सुरक्षित राहिली आहे. श्‍वान मुख्य बाजारपेठेत मात्र घुटमळले. याठिकाणी पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस उपअधिक्षक अनिल कदम ,पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, "करवीर' चे पोलीस निरीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरक्षिक तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान 

फोडण्यात अपयश
बॅंकेत चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांना तिजोरी फोडण्यात अपयश आले. बॅंकेला सीसीटीव्ही,सायरन आणि सुरक्षारक्षक ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याबाबत बॅंकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
- तिरुपती काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले
बॅंकेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. बॅंकेतील सोनेतारण व रोकड सुरक्षित आहे. यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला बॅंकेत सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी कळवले आहे.
- कुमुद भारद्वाज, बॅंक व्यवस्थापक

सुटकेचा नि: श्‍वास
बॅंकेतून 15 लाखांची रोकड आणि पंधरा ते सोळा कोटींचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची बातमी जिल्हात वाऱ्यासारखी पसरली. या वृताने बॅंकेतील सर्व कर्मचारी हादरलेच. तसेच पोलीसही घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात ठेवून घटनास्थळी दाखल झाले. मात्र रोकड आणि तारण ठेवलेले सोने आणि अन्य ऐवज सुरक्षित असल्याचे समजतात पोलीसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in kolhapur dhamod axis bank