कोल्हापूरः भर वस्तीतील बंद बंगला चोरट्यानी फोडला 

भूषण पाटील
सोमवार, 8 जुलै 2019

  • हॉकी स्टेडियम परिसरातील बालाजी पार्क येथील जिजाऊ बंगल्यात  चोरी 
  • आलिशान मोटारीसह चार तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी तसेच 53 हजारांची रोकड असा जवळपास 18 लाखांचा ऐवज चोरला.
  • घरातील सीसीटीव्हीचीही मोडतोड केली असून त्याची हार्डडिस्क ही पळवली

 

कोल्हापूर - बंद बंगला फोडून  अज्ञातांनी आलिशान मोटारीसह चार तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी तसेच 53 हजारांची रोकड असा जवळपास 18 लाखांचा ऐवज लंपास केला. हॉकी स्टेडियम परिसरातील बालाजी पार्क येथील जिजाऊ बंगल्यात घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला. चोरत्यांनी घरातील सीसीटीव्हीचीही मोडतोड केली असून त्याची हार्डडिस्क ही पळवली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले. या प्रकरणी निखिल उत्तम मुळे (वय 30 ) यांनी फिर्याद दिली असून भागातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी; बालाजी पार्क येथे निखिल मुळे यांचा जिजाऊ हा बंगला आहे. या ठिकाणी ते आई उर्मिला यांच्यासह राहतात. निखिल हे उद्यमनगर मधील एका कंपनीत काम करतात. निखिल यांना कंपनीच्या कामानिमित्त सोलापूरला जायचे असल्याने त्यांनी शनिवारी रात्री आई उर्मिला यांना बुधवार पेठ येथे नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर ते पुढे निघून गेले. बाहेर पडताना त्यांनी घरातील मुख्य दरवाजा तसेच गेटला कुलूप लावले होते.  

शनिवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी मुळे यांच्या गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरातील तळमजल्यावरील एक तसेच पहिल्या मजल्यावरील तीन खोल्यांमध्ये साहित्य विस्कटले तसेच या खोल्यांमधील कपाटे उचकटून त्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने, 50 हजारांचे दोन किलो चांदी व 53 हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला.

चोरी दरम्यान मुळे यांनी शेडमध्ये लावलेल्या गाडीची (mh 09 EU-2300) चावी चोरट्यांच्या हाती लागल्याने जाताना ही आलिशान मोटार ही त्यांनी लंपास केले आहे. आज पहाटे निखिल घरी परतले त्यावेळी त्यांना गेट अर्धवट उघड्या अवस्थेत दिसले त्यांनी आत जाऊन पाहिले असता शेडमधील मोटार त्यांना दिसली नाही. तसेच घराच्या मुख्य दरवाज्याची कडी-कोयंडा तुटला असल्याचे त्यांनी पाहिले. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ नातेवाइक तसेच जुना राजवाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी घरात आज जाऊन पाहिले असता आतील सर्व खोल्यातील साहित्य चोरट्यांनी विस्कटले होते. चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

चोरीबाबत समजतात नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in Kolhapur near Hockey stadium