सांगली : ढालगावातून चोरट्यांनी ९ तोळे दागिने केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

मध्यरात्री चोरट्यांनी बाहेरून लावलेली कडी काढून आत प्रवेश केला

ढालगाव (सांगली) : येथील शंकर महादेव देसाई यांच्या घरात काल मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून ९ तोळे सोने, दोन पैंजण जोड व ४७ हजार रुपये रोख लंपास केले. तर एका मजुराच्या झोपडीतील चार मोबाईल व रोख पाच हजारही चोरून नेले. पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शंकर देसाई यांचे घर पोलिस चौकीमागील बाजूस काही अंतरावर आहे. देसाई यांच्या घराला तीन दरवाजे आहेत. एका घरात त्यांचा मुलगा झोपला होता. तर स्वतः देसाई त्यांची पत्नी व माहेरी आलेली मुलगी बाहेरच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. एका दरवाजाला बाहेरून कडी घातली होती. तर एका दरवाजाला आतून कडी लावून झोपले होते. 

हेही वाचा - ब्रेकिंग : पोलिस उप निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी बाहेरून लावलेली कडी काढून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले दोन गंठण, कानातील टॉप्स व दोन पैंजण जोड असे नऊ तोळे सोने व कपाटात ठेवलेले ४७ हजार रुपये रोख लंपास केले. बाजाभावाप्रमाणे सोन्याची किंमत चार लाखांच्या जवळपास होते. असे मिळून त्यांच्या घरातून सुमारे चोरट्यांनी चार लाखांवर डल्ला मारला आहे. 

देसाई यांची मुलगी शोभा ही पाहुण्यांच्या लग्नकार्यासाठी आली होती. तीचे पाच तोळे सोने व देसाई यांच्या पत्नीच्या दोन तोळे सोन्याचा यात समावेश आहे. चोरी झाल्याची घटना सकाळी उठल्यावर लक्षात आली. त्यानंतर पोलिसात कळवण्यात आले. घटनेच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांकडून फिंगरप्रिंट घेण्यात आल्या व डॉगस्कॉड आणुन तपासणी करण्यात आली. 

दरम्यान, ढालगाव महावितरणसमोर एका घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी झोपडी मारून पाच कामगार राहण्यास आहेत. त्याठिकाणी चोरट्यांनी झोपडीत घुसून पाच मोबाईल व पाच हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना ही रात्री घडली आहे. पोलिस अमिरशा फकीर, सुहास चव्हाण, सुहास मोहिते, दीपक गायकवाड, गजानन बिराजदार, अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. रात्री साडेसातच्या सुमारास विभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. 

हेही वाचा -  खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज  पन्नासावा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीविषयी...

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in sangli dhalgaon 90 gram gold theft from home in sangli