ब्रेकिंग: सोने व्यापाऱ्याला लुटणारे पाच दरोडेखोर जेरबंद ; अडीच कोटींचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

मिरज-पंढरपूर रस्त्यावीरल देशिंग फाटा येथे ही कारवाई करण्यात आली

सांगली : शेगाव (ता. जत) येथे सोने देण्यास जात असताना दरोडेखोरांनी व्यापारी व त्याच्या साथीदरांच्या डोळ्यात चटणी फेकून त्यांना मारहाण करत अडीच कोटी रूपयांचे चार किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने पळवून नेणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. एलसीबीसह तीन पथकांनी संयुक्त कारवाई केल्याने 24 तासात आरोपी जेरंबद झाले. व्यापाऱ्याच्या व्यवसायातील भागीदाराचाही यात समावेश आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावीरल देशिंग फाटा येथे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रवीण उत्तम चव्हाण (वय 27, रा. य.पा. वाडी, आटपाडी), विजय बाळासाहेब नांगरे (वय 27, रा. य. पा. वाडी, ता. आटपाडी), विशाल बळू करांडे (वय 27, रा. गोरेगाव, ता. खटाव, सातारा), तात्यासो शेट्टीबा गुसाळे (वय 36, मरडवाघ, ता. खटाव, सातारा), वैभव साहेबराव माने (वय 32, भोसरे, ता. खटाव, सातारा) अशी त्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोटी 26 लाख 13 हजार 500 रूपयांचे सोने, चारचाकी, पिस्तूल सारखे दिसणारे लायटर, मोबाईल असा 2 कोटी 27 लाख 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

अधिक माहिती अशी,  फिर्यादी बाळासाहेब सावंत हे पळसखेड (ता. आटपाडी) येथील आहेत. बेळगाव येथे सराफ गल्ली, खडेबाजारमध्ये राहतात. सावंत व अन्य एकजण गुरुवारी सायंकाळी बेळगावहून (केए 22 एमबी 5422) या चारचाकी गाडीतून सोने पोहचविण्यासाठी शेगावकडे निघाले होते. दरम्यान, जतपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळी वस्तीजवळ मध्यरात्री एकच्या सुमारास लघुशंकेसाठी दोघे गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी पाठलाग करत असलेले पाच दरोडेखोर पांढऱ्या चारचाकीतून घटनास्थळी आले. दरोडोखरांनी सावंत व त्यांच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण करत गाडीतील साडे चार किलो सोने घेऊन पसार झाले. बाळासाहेब सावंत यांनी तत्काळ जत पोलिस ठाणे गाठत झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, पोलिस अधीक्षक गेडाम यांनी तत्काळ संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन पथके तयार करण्यात आली. पथकातील पोलिस गस्तीवर होते. फिर्यादी सावंत यांचा भागीदार प्रवीण चव्हाण यास चौकशीसाठी बोलवण्यात आले. सखोल चौकशी केली असता चार साथीदारांसह सोने लुटल्याची कबुली दिली. चोरीचे सोने विक्रीसाठी चार साथीदार देशिंग फाटा येथे येणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार सापळा रचून चौघांना अटक करण्यात आली. संशयितांकडून प्रत्येकी 100 ग्रॅम सोन्याची 21 बिस्किटे असून त्याची सुमारे एक कोटी 25 लाख, दोन किलो 430 ग्रॅम वजन असलेले तेजाब (गाळलेले सोने), त्याची सुमारे एक कोटी 21 लाखाचे सोने जप्त करण्यात आले. कारवाईत अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, जतचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्यासह पथकाचा समावेश होता. 

हे पण वाचाभावा ! उगच हॉर्न कशाला वाजवतोस 

दहशतीसाठी बनावट पिस्तूल 
पाच जणांनी नियोजनबद्ध ही चोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी बनावट पिस्तूलचा वापर केल्याचे दिसून आले. पिस्तूल नसून तो एक लायटर होता. तसेच संशयित प्रवीण चव्हाण हा फिर्यादीच्या व्यवसायात भागिदार असल्याने ते कधी सोने नेणार असल्याची माहिती होती. त्यानुसार कट रचण्यात आल्याचे पोलिसंनी सांगितले. 

पन्नास हजारांचे पारितोषिक 
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावला. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पन्नास हजारांचे पारितोषिक दिले. त्यांच्या कामगिरीचे कौतुकही केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery sangli jat five accused arrested