फिर्यादीनेच साथीदाराच्या मदतीने रचला चोरीचा बनाव...तासगावमधील जबरी चोरीचा 48 तासात छडा...एलसीबीची कारवाई

शैलेश पेटकर
Friday, 18 September 2020

सांगली- तासगावमधील नृसिंहवाडी ते पेड रस्त्यावर झालेल्या जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 48 तासात छडा लावत आरोपींना जेरबंद केले. यात फिर्यादीनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरीचा बनाव रचल्याचे समोर आले. फिर्यादीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. फिर्यादी सचिन रामचंद्र यादव (वय 23, रा. नृसिंहवाडी), विकास हिम्मत चव्हाण (22, रा. करोली, ता. मिरज) आणि विलास आबासाहेब साळुंखे (31, रा. घोटी, ता. खानापूर) या तिघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नृसिंहवाडी येथील बचत गटाचे 51 हजार 700 रुपये पेड येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत भरण्यासाठी सचिन यादव व त्याचा मित्र गेला होता. यावेळी गुरव वस्तीजवळ काळ्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून ही रक्कम लुबाडल्याची फिर्याद यादव याने तासगाव पोलिस ठाण्यात दिली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एलसीबीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता. ही चोरी फिर्यादीच्या संगनमताने त्याच्या दोन साथीदारांनी केल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली.

हे तिघेही कुमठे ते काकडवाडी फाटा या रस्त्यावर थांबल्याचे समजताच एलसीबीच्या पथकाने सापळा लावून तिघांनाही ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या यादव यानेच साथीदाराशी संगनमत करून 51 हजार रुपयांच्या चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. संशयितांकडून पोलिसांनी 16 हजाराची रोकड, तीन मोबाईल व मोटारसायकल असा 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सहायक फौजदार अच्युत सूर्यवंशी, सतीश अलदर, सागर टिगरे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, महादेव धुमाळ, जितू जाधव, अरुण सोकटे, कॅप्टन गुंडेवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Tasgaon solved in 48 hours: LCB action