रोहित पवारांचे मिशन पंचायत समिती 

Rohit Pawar's Mission Panchayat Committee
Rohit Pawar's Mission Panchayat Committee

कर्जत : पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यापासून कर्जत तालुक्‍यातील राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. भाजपवर कडी करीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसने शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. आता भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीतही हा प्रयोग राबवून आमदार रोहित पवार पुन्हा एकदा विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर दुसरीकडे भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. 

कर्जत पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. त्यामुळे येथे पुन्हा एकदा महिलाराज येणार हे निश्‍चित. पंचायत समितीत एकूण सदस्य संख्या आठ आहे. त्यात राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या मदतीने भाजपने ही पंचायत समिती ताब्यात घेतली. मात्र, आता विधानसभेला राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी पराभव केला. त्याची पुनरावृत्ती पंचायत समितीत करण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. 
पंचायत समितीत सभापतिपदी भाजपच्या साधना कदम आहेत. शिवसेनेचे प्रशांत बुद्धिवंत हे उपसभापतिपदी आहेत. बुद्धिवंत यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला, तर राष्ट्रवादीचे बहुमत होत सत्ता स्थापन होऊ शकते. 

सभापतिपदासाठी विद्यमान सभापती साधना कदम व ज्योती शिंदे, तर राष्ट्रवादीच्या वतीने अश्विनी कानगुडे व मनीषा जाधव या पात्र आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीकडे सध्या प्रत्येकी चार असे समसमान बलाबल असले, तरी सेनेचा 
सदस्य राष्ट्रवादी आघाडीत सहभागी झाला तर त्यांची सदस्य संख्या पाच होत बहुमत प्राप्त होईल. भाजपचे पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे हे माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांचे निकटवर्ती आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत पांडुळे यांनी रोहित पवार यांचा प्रचार केला. त्यामुळे गांगर्डे राष्ट्रवादीच्या गोटात गेले, तर भाजपचे आव्हानच संपुष्टात येईल. 

...तर भाजपवर कुरघोडी 
सध्या पंचायत समिती, बाजार समिती, नगरपंचायत, बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. सध्या तालुक्‍यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड असे दिग्गज तालुक्‍यात आहेत. बदललेली समीकरणे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पंचायत समितीतही भाजपवर कुरघोडी होऊ शकते. 

ते परत आले तर आनंदच 
महाविकास आघाडीचा राज्यात प्रयोग झाला आहे. तोही कर्जत येथे होणे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या विचारांचे सदस्य तिकडे गेले. ते परत आले, तर निश्‍चितच आनंद होईल. 
- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com