शाळांसाठी "रोटरी' उभारणार "व्हर्चुअल क्‍लासरूम'

सतीश वैजापूरकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

जिल्हा परिषद प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा प्रकल्प सुरू होईल, असे गृहीत धरून पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार प्राथमिक शिक्षकांना "व्हर्चुअल एज्युकेशन'चे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शिर्डी : जिल्हा परिषदेच्या सुमारे पाच हजार प्राथमिक शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांसाठी "व्हर्चुअल क्‍लासरूम'ची सुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी रोटरी क्‍लबने सुरू केली आहे. तब्बल दीडशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी उद्योगजगताचे सहकार्य घेण्यात आले आहे. नगर शहरातील उद्योजक प्रमोद पारिख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहे. आंतरराष्ट्रीय रोटरीचे पुढील वर्षीचे नियुक्त प्रांतपाल शेखर मेहता यांच्या उपस्थितीत काल येथील हॉटेलात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

अवश्‍य वाचा- मैला फिल्टरायझेशन प्रकल्प कार्यान्वित 

जिल्हा परिषद प्रशासनानेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा प्रकल्प सुरू होईल, असे गृहीत धरून पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे 11 हजार प्राथमिक शिक्षकांना "व्हर्चुअल एज्युकेशन'चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दृकश्राव्य माध्यम व थ्री-डी प्रतिमांद्वारे दिल्या जाणाऱ्या आधुनिक शिक्षणामुळे विषयाचे आकलन सहज होण्यास मदत होते. शहरी भागातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून या पद्धतीचे शिक्षण यापूर्वीच सुरू झाले आहे. या शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नयेत, या हेतूने रोटरीतर्फे नगर जिल्ह्यात हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. 

आवश्‍यक नियोजन पूर्ण

नगर जिल्ह्यात "रोटरी'ने राबविलेला आजवरचा हा सर्वांत मोठा शैक्षणिक प्रकल्प असेल. त्याची घोषणा साईबाबांच्या शिर्डीत आणि आंतरराष्ट्रीय रोटरीचे पुढील वर्षीचे नियुक्त प्रांतपाल शेखर मेहता यांच्या उपस्थितीत करण्याची संधी मिळाली याचा "रोटरी'चे पदाधिकारी व सदस्यांना विशेष आनंद होत आहे. या प्रकल्पाच्या निधीसह त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्‍यक नियोजन पूर्ण झाले आहे. 
- प्रमोद पारिख, उद्योजक, नगर 

भारत रोटरीला मदत करणारा देश

रोटरी ही काही घेणारी व नव्हे तर समाजासाठी काही तरी देणारी संघटना आहे. रोटरीच्या सदस्यांनी सेवाभावी प्रकल्प राबवावेत. भारताची लोकसंख्या तरुण असल्याने आगामी काळात आंतरराष्ट्रीय रोटरीवर भारताची छाप असेल, सदस्यसंख्या वाढविणे हे लक्ष्य आहे. भारत आता रोटरीला मदत करणारा देश झाला आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय रोटरीचे नियोजित प्रांतपाल शेखर मेहता यांनी केले. 

अवश्‍य वाचा-  कर्जमाफी प्रक्रियेत "ही' बॅंक आघाडीवर 

नियोजित प्रांतपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा येथे सोलापूर, सातारा, नगर व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. सुहास वैद्य, प्रमोद पारिख, डॉ. दीपक पोफळे, विष्णू मुंडे, डॉ. राजेंद्र प्रधान यांच्यासह शहर रोटरीचे अध्यक्ष निखिल बोरावके, सचिव नीलेश गंगवाल, डॉ. एम. वाय. देशमुख, उद्योजक राजेंद्र कोते, अभय दुनाखे, डॉ. पी. जी. गुंजाळ व अभियंता शरद निमसे उपस्थित होते. 

तरुण वर्गाला आणू इच्छितो

मेहता म्हणाले, की जागतिक पातळीवर पुढील वर्षभरात क्‍लबची सदस्यसंख्या बारा लाखांवरून तेरा लाखांवर न्यायची आहे. लोकांचा विश्‍वास असल्याने दर वर्षी अडीच हजार कोटी रुपये खर्चाचे सेवा प्रकल्प क्‍लबतर्फे उभारले जातात. निधी संकलनात आघाडीवर असलेली रोटरी आता तरुण वर्गाला आपल्याकडे आणू इच्छिते. ऍड. बाळासाहेब कोते, माजीद पठाण, दत्तू गोंदकर, आकाश सोनार, आर्किटेक्‍ट रविकिरण डाके, ऍड. बाळासाहेब कोते आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary Club want to create a virtual classroom for schools