मैला फिल्टरायझेशन प्रकल्प कार्यान्वित

अमित आवारी
बुधवार, 15 जानेवारी 2020

नगर शहरातील मैला उपसण्यासाठी महापालिकेकडे एकच सक्‍शन मशिन आहे. शहरातील सेफ्टी टॅंकमधून उपसलेला मैला कोणतीही प्रक्रिया न करता सीना नदीत सोडला जातो. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेला नोटीसही दिली होती.

नगर : महापालिकेच्या सक्‍शन मशिनने आणलेल्या मैल्यावर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य पाणी बनविण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. अवघ्या एका महिन्यात राज्य शासनाने दिलेल्या निधीच्या जोरावर महापालिकेने हा प्रकल्प उभारला आहे. आता प्रकल्प कार्यान्वित झाल्याने सीना नदीतील प्रदूषणास काही प्रमाणात आळा बसेल. 

हेही वाचा- कर्जमाफी प्रक्रियेत "ही' बॅंक आघाडीवर 

नगर शहरातील मैला उपसण्यासाठी महापालिकेकडे एकच सक्‍शन मशिन आहे. शहरातील सेफ्टी टॅंकमधून उपसलेला मैला कोणतीही प्रक्रिया न करता सीना नदीत सोडला जातो. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेला नोटीसही दिली होती. त्यानुसार महापालिकेने मैल्याचे फिल्टरायझेशन करून उर्वरित पाणी सीना नदीत सोडण्यासाठीचा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प फराहबक्ष महालाजवळील महापालिकेच्या जागेत उभारण्यात आला आहे. 

असे चालते प्रकल्पाचे काम

महापालिकेला हा प्रकल्प उभारणीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च येणार होता. हा सर्व खर्च राज्य शासनाने दिला. शिवाय कार्यारंभ आदेशही राज्य शासनाकडून मिळाले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरवात झाली. अवघ्या एका महिन्यात नऊ टाक्‍या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील सक्‍शन मशिनने आणलेला मैला चार शोष टाक्‍यांत टाकला जातो. यातून मैला व पाणी वेगळे होते. मैला वाळण्यास एक महिना लागतो. या वाळलेल्या मैल्याचा उपयोग सोनखत म्हणून होणार आहे. वेगळे झालेले पाणी चार शोष टाक्‍यांतून शुद्ध केले जाते. पाण्याचे क्‍लोरिफिकेशन होते. हे पाणी एका मोठ्या प्लॅस्टिकच्या टाकीत साठविले जाते. हे पाणी शेती व झाडांना दिले जाते. 15 दिवसांपासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. 

अवश्‍य वाचा- विषय समिती सभापतींच्या निवडीतूनही भाजपची माघार 

सीनेचे प्रदूषण कमी होणार 
राज्य शासनाने दिलेल्या निधीतून मैल्यावरील प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यात आला आहे. तो प्रकल्प तयार झालेला आहे. त्यामुळे आता सीना नदीच्या पाण्यात प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. 
- कुमार सारसर, मुख्य स्वच्छता निरीक्षक, महापालिका, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sludge Filteration project implemented in nagar