शेतकरी आला मेटाकुटीला : सांगलीत दोन एकर भोपळ्यावर फिरवला रोटावेटर....!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

शंकर पाटील व सुरेश शंकर पाटील या दोन शेतकऱ्यांनी आज आपल्या दोन एकर शेतातील भोपळा पिकावर रोटावेटर फिरवला.

इस्लामपूर ( सांगली) : लॉकडाऊननमुळे शहरातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याचा फटका भोपळा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. उत्पादित माल शेतात सडून चालल्याने चिकूर्डे (ता. वाळवा ) येथील शेतकरी विजयकुमार शंकर पाटील व सुरेश शंकर पाटील या दोन शेतकऱ्यांनी आज आपल्या दोन एकर शेतातील भोपळा पिकावर रोटावेटर फिरवला. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अवस्थेत शेतकरी हतबल झाले असून दाद कुणाकडे मागायची या पेचात आहेत. त्यांना शासनाकडून मदतीची गरज आहे.
    
चिकूर्डे येथील विजयकुमार शंकर पाटील व सुरेश शंकर पाटील या दोन शेतकऱ्यांनी १३ जानेवारीला आपल्या दोन एकर शेतात सेंच्युरियन १०७६ या जातीच्या भोपळा पिकाची लागवड केली होती. या लागवडीसाठी त्यांना दीड लाख रुपये खर्च आला होता. भोपळा काढणीला यायला आणि कोरोनाचे वातावरण व्हायला एकच गाठ पडली. २१ मार्च रोजी कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी देशात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मोठी हॉटेले बंद झाली.

हेही वाचा- दिवे तर लावले पण डोक्‍यात प्रकाश पडेल का?

वाहतुकीचा खर्च  पडला अंगावर​

त्यामुळे भोपळा पीक खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. तालुक्यातील काही शेतकरी आपला काढलेला माल घेऊन मुंबईला गेले; परंतु मालाला काहीच मागणी नसल्याने त्यांना माल जाग्यावर टाकून माघारी परतावे लागले. उलट येण्याजाण्याचेही पैसे निघाले नाहीत! वाहतुकीचा खर्च अंगावर पडत असल्याने हतबल झालेल्या पाटील बंधूनी आज आपल्या दोन एकर शेतातील भोपळा पिकांवर रोटावेटर फिरवला. यात पाटील बंधूंचे जवळपास सहा लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. यासह सर्वच शेतकरी डोक्याला हात लावून बसले आहेत. या परिस्थितीत शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना आहेत. 

हेही वाचा- ब्रेकिंग - बेळगावात तबलिगीतील आणखी चार जण कोरोना पॉझिटीव्ह

माल टाकला जाग्यावरच 

"लॉकडाऊन काळात काढलेला माल घेऊन मुंबईला गेलो होतो; परंतु मोठी हॉटेले बंद असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही. माल जाग्यावर टाकून परत आलो. वाहतुकीचा खर्चही अंगावर पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे."
विजयकुमार पाटील, चिकूर्डे.शेतकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotavator rotated on two acres of pumpkin sangli marathi news