आर.आर. आबांचे चिरंजीव कोरोना "पॉझिटीव्ह'...बंधू देखील बाधित 

घनश्‍याम नवाथे
Thursday, 3 September 2020

तासगाव (सांगली)- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि बंधू सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. 

तासगाव (सांगली)- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि बंधू सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. 

तासगाव तालुक्‍यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. आजअखेर कोरोना बाधित रूग्णांचा आकडा साडे सातशेहून पुढे गेला आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहून तासगावात "लॉकडाउन' ची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच काही गावात देखील जनता कर्फ्यू पाळला जात आहे. तासगावातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने 62 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी महिला तंत्रनिकेतन होस्टेलमध्ये करण्यात आली आहे. नगरपालिका, आयएमए आणि बीएएमएस डॉक्‍टर्स संघटना, निमा आणि अन्य संघटनाच्यावतीने हे हॉस्पिटल सुरू केले आहे. 

कालच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते याचे उद्‌घाटन झाले. या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमास रोहित पाटील उपस्थित होते. तशातच आमदार सुमन पाटील यांचे मतदार संघातील दौरे आणि कार्यकर्त्यांची निवासस्थानी होणारी गर्दी यामुळे दक्षता म्हणून कोरोना तपासणी करण्यात आली. तसेच कुटुंबातील सदस्यांची देखील चाचणी केली. त्यामध्ये आमदार पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर चिरंजीव रोहित आणि आबांचे बंधू सुरेश पाटील यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघांची तब्येत ठणठणीत आहे. दरम्यान दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घ्यावी. तसेच काळजी घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R.R.Patil son Corona "Positive". Brother also affected