esakal | नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य

नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य

sakal_logo
By
विष्णू मोहीते

सांगली : कोरोनाला (covid-19) प्रतिबंध करण्यासाठी योग्य वर्तन ठेवल्यास आपण तिसरी लाट रोखू शकू. अन्यथा तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यामध्ये अटळ आहे. माणसाचा जीव वाचवण्याला प्राथमिकता असून त्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या, ट्रेसिंग, लसीकरण (vaccination) आणि योग्य वर्तन या आधारे रूग्णसंख्या नियंत्रित करणे शक्य आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रूग्णसंख्या किती होती हे लक्षात घेवून ऑक्सिजन, स्टिरॉईड, अनुषंगिक औषधे यांचा बफर स्टॉक ठेवा, असा सल्ला राज्याचे आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे (subhash salunkhe) यांनी आज दिला. होमआयसोलेशनच्या (home isolation) आग्रहामुळे सांगली जिल्ह्यात (sangli district) रूग्णसंख्या कमी झाली नाही, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची पाहणीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. साळुंखे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, झेडपीचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते.

हेही वाचा: Good News - आता दाखल्याशिवाय मिळणार शाळेत प्रवेश

डॉ. साळुंखे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर आरोग्य व्यवस्थेच्या काम चांगले असले तरी जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर स्थिर असणे, रूग्णसंख्येत घट न होणे हे विषय अत्यंत चिंतेचे आहेत. लोकांची कोविड बद्दलची भिती कमी झाली असून प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तनास प्रतिसाद कमी झाला आहे. होमआयसोलेशनच्या आग्रहामुळे सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी झाली नाही. त्यामुळे होमआयसोलेशन ऐवजी कम्युनिटी आयसोलेशन, संस्थात्मक विलगीकरण यावर भर देणे अनिवार्य आहे.

पुढे ते म्हणाले, खासगी रूग्णालयातून होणाऱ्या एचआरसीटी चाचण्यावरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी दुसऱ्या टप्प्यात प्रभावहीन झाली. यापुढे कंटेनमेट झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे झालीच पाहिजे यासाठी कटाक्ष ठेवा. तरच रूग्णसंख्या कमी होऊ शकेल. ग्राम दक्षता समितीने जे सुपर स्प्रेडर आहेत अशा लोकांना शोधून त्यांचे तातडीने लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, तिसरी लाट रोखण्यासाठी महिनाभर मेहनत घेणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत नागरी भागातील टेस्टींग कमी होवू नये यासाठी दक्षता घ्यावी. मुख्यकार्यकारी अधिकारी डुडी व पोलिस अधिक्षक गेडाम यांनी अनुषंगिक सूचना दिल्या.

हेही वाचा: Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत

कोरोनाची ३३ रुग्णालये बंदचा विचारला जाब

सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर मिळत नसल्याच्या तक्रारीवरून डॉ. साळुंखे यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने एकाचवेळी ३३ हॉस्पिटल बंद केल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयातील यंत्रणेवर ताण पडत असल्याची बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

loading image