Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

Video : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

सातारा : कराड तालुक्यातील मसूर, कोपर्डे भागात सध्या एक महिलेची दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी वाहनांना लिफ्ट मागून अडवून ती लूट मार करते असे प्रकार घडत आहेत. हाेय लिफ्ट मागून ती अक्षरक्षः लूटते अशीच चर्चा आहे. खरंतर या परिसरात दाेन प्रकार घडले आहेत. त्याती एखाद दुसरा प्रकार खरा असल्याचे पाेलिसांचे देखील म्हणणे आहे. पण या घटनेवरुन परिसरात सध्या समाज माध्यमांमधून अफवांचे पेव फुटले आहे.

नेमका हा प्रकार घडला हाेता 

शिरवडे हद्दीत नाईगडे वस्तीजवळ सह्याद्री कारखान्याचे चिटबॉय दयानंद सरगडे (रा. कोपर्डे हवेली) यांच्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केला; पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्‍यात बचावले. हल्लेखोरांमध्ये एक महिला व पुरुषाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले हाेते. 
चिटबॉय सरगडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. शिरवडे, रेल्वे स्टेशन, नडशी कॉलनी येथील तरुणांचा जमाव व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन चव्हाण आणि सहकारी घटनास्थळी पोचले. परिसरातील उसाच्या शेतांसह शंकास्पद जागा धुंडाळण्यात आल्या; रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा मागमूस लागला नाही. दरम्यान याच परिसरात एका चारचाकी वाहनाला अडवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूने घेत आपली सुटका करून घेतल्याचे बाेलले जाते. दरम्यान, महिला मजुरांचा कामावर येण्यास नकार येत आहे. काही दिवसांपूर्वी माळवाडी येथील महिलेचा खून झाला आहे. अशात चोरट्यांकडून मारहाण होत असल्याच्या स्थितीमुळे महिला मात्र तणावात हाेत्या.
 

कोपर्डे हवेली : गेल्या काही दिवसांपासून कोपर्डे हवेली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या चर्चेने संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. शिरवडेनजीकच बुधवारी रात्री चिटबॉयला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता. 27) गावच्यानजीक उत्तर दिशेस रात्री आठच्या सुमारास चोरट्यांकडून दोन मुलांना मारहाण करण्यात आली. घटनास्थळावरील माहिती अशी हाेती ः येथील आठवीत शिकणारा अविनाश देवकुळे व राहुल होवाळ काल रात्री आठच्या सुमारास मित्राकडे गेले होते. मित्र घरी नसल्याने ते पुढे चालत गेले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत एक महिला दोघांजवळ येवून त्यातील राहुलला पकडून शेतात ओढत घेऊन गेली. संबंधित महिला त्याला मारहाण करत असतानाच अविनाशने त्या महिलेला दगड मारून राहुलला तिच्या तावडीतून सोडविले. यावेळी बाजूला काही अंतरावर त्या महिलेचा पुरुष साथीदारही होता. राहुलची सुटका करून त्याला सोबत घेत दोघेही घाबरलेल्या अवस्थेत गावात पळत सुटले. त्यानंतर घडलेली घटना गावात सांगितल्यावर गावातील युवकांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाहीत. संबंधित महिलेला पुरुष केवळ सूचना देण्याचे काम करत असल्याचे मुलांनी सांगितले. दरम्यान, चोरट्यांशी झालेल्या झटापटीत अविनाशची कपडे फाटली आहेत. घाबरलेल्या अवस्थेत त्यांना निटसे बोलता येत नव्हते. दक्षतेचा इशारा म्हणून ग्रामस्थांनी सावध राहण्याच्या सूचना सिध्दनाथ मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून देण्यात आल्या. गेल्या चार दिवसांपासून घडत असलेल्या अशा घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. 

दोघेही धिप्पाड... 

घाबरलेल्या अवस्थेत संबंधित मुलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एक महिला व एक पुरुष होता. त्यातील पुरुष मराठी भाषा बोलत होता, महिलेची भाषा वेगळीच होती. महिलेने टी शर्ट-पॅन्टचा पेहराव केला होता. महिला आणि पुरुष दोघेही धिप्पाड होते. सध्या लोक रात्र-रात्र जागून गस्त घालत आहेत. मात्र अफवाच खूप असल्याच समोर आलं आहे. पोलिसांनी बंदोबस्तही वाढवलाय आणि असा प्रकार घडल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

आता सर्वांवर आलीय जबाबदारी 

आता परिसरात चोरी, मारहाणीचे होणारे प्रकार सध्या चर्चेत आहेत. या घटनांची चौकशी होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित चोरटे सराईतपणे वावरतील. या वातावरणाचा फायदा घेत काही चुकीचा प्रकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनीही अशा घटनांच्या मुळापर्यंत जाऊन त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. काही दिवसांनी घटनेच्या सत्यतेबाबत चर्चाही होईल. मात्र, घटना घडलेल्या ठिकाणीच संबंधित पीडिताला स्थानिकांकडे सोपवून पोलिस तपास यंत्रणा चोराच्या शोधात निघाल्याचे चित्र दिसते. चोर सहजासहजी रस्त्याने सापडणारही नाहीत. या प्रकारांमुळे तरुणाई पुढे सरवावली आहे. मात्र, अनोळख्या व्यक्तीस बेदम मारहाण करून चुकीची घटना घडू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

वाचा : मुंबई : काेयनेतील बाेटींगसाठी कट्टर विराेधक एकत्र

चोरीची परंपरा लादून एका विशिष्ट समाजावर खापर फोडून हे वातावरण निवळेल काय? असाही प्रश्‍नही उपस्थित होत आहे. व्हॉटस्‌ऍपचा करमणूक म्हणून वापर करण्यापेक्षा सकारात्मक वापर होणे गरजेचे आहे. घटनेची खात्री करूनच संदेश पुढे जाणे आवश्‍यक आहे. एखादी जबाबदार व्यक्तीच रात्रगस्त घालण्यासाठी मोबाईलवर गेम खेळत बसण्याचा सल्ला देत असल्यास समाजाचे नेमके चित्र काय? हे समजते. रात्रगस्त व घटनास्थळी पोचताना पोलिस यंत्रणा तत्पर आहे; पण खरे गुन्हेगार सापडेपर्यंत पोलिस प्रशासनाचा जीव भांड्यात पडणार नाही. सामान्यांचाही तोपर्यंत धीर मिळणार नाही. 

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गावात सायरन बसवून घ्यावा, युवकांनी जागता पहारा द्यावा, पोलिसांची गस्त सुरूच असणार आहे. तरीही नागरिकांनी सतर्कता बाळगावी. 
- गणेश कड, सहायक पोलिस निरीक्षक, कऱ्हाड तालुका.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com