वाघ आला... वाघ आला...video

सुधीर पठारे 
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

निघोज (नगर) : पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडी, दरोडी, निघोज, अळकुटी परिसरात 
पट्टेरी वाघ आलाय. पुरावा म्हणून त्याच्या गुरगुरण्याचाही व्हिडिओही प्रत्यक्षदर्शीने काढलाय. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओचा अनेकांनी धसका घेतला आहे. कारण या परिसराला अगोदरच बिबट्याने दहशतीखाली घेतले आहे. बिबट्यासोबत वाघ आलाच कसा? या प्रश्‍नामुळे वन विभागाचे अधिकारीही भयचकित झालेत. 

निघोज (नगर) : पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडी, दरोडी, निघोज, अळकुटी परिसरात 
पट्टेरी वाघ आलाय. पुरावा म्हणून त्याच्या गुरगुरण्याचाही व्हिडिओही प्रत्यक्षदर्शीने काढलाय. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओचा अनेकांनी धसका घेतला आहे. कारण या परिसराला अगोदरच बिबट्याने दहशतीखाली घेतले आहे. बिबट्यासोबत वाघ आलाच कसा? या प्रश्‍नामुळे वन विभागाचे अधिकारीही भयचकित झालेत. 

गुरुवारी (ता. 14) रात्री रेनवडी (ता. पारनेर) परिसरात वाघाचे हे थरारनाट्य घडले. जंगली श्‍वापदाने निघोज परिसराची झोप उडवली आहे. वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून होत आहे. वन विभाग दखल घेत नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे.&

रेनवडी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील परिसरात रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी वाघ पाहिला. त्यांची भीतीने गाळण उडाली. ते वाहनातून चालले असल्याने एकाने वाघाचा व्हिडिओ काढला. त्यात तो गुरगुरताना दिसत आहे. ती सर्वत्र व्हायरल होत आहे. या भागात वाघ आलाच कसा, यामुळे वन विभागाचे अधिकारी भयचकित आहेत. या परिसरात पट्टेरी वाघ आहे, असा दावा नवनाथ येवले, संतोष भोर, संतोष येवले करीत आहेत. 

तालुक्‍यातील शिरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दिग्विजय उचाळे हा शालेय विद्यार्थी जखमी झाला. वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडीत राधाबाई कारभारी वाजे (वय 69) यांना जीव गमवावा लागला. 

गणपत येवले, रामभाऊ पवार, भिका येवले, रामदास मेचे, अनिल नऱ्हे, नाना ठोंबरे या शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. ग्रामस्थांच्या मागणीवरून या भागात दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाने विशेष प्रयत्न केले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

कुकडी नदीकाठच्या गावांमध्ये सहा पिंजरे लावले आहेत. आमचे वनरक्षक परिसरात गस्त घालीत आहेत. तसेच पारनेर तालुक्‍यासाठी अजून नवीन दहा पिंजरे मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे, अशी माहिती. 
तालुका वन अधिकारी अश्‍विनी दिघे यांनी "सकाळ'ला दिली. 

लांडगा आला रे आला...व्हायरल सत्य 
रेनवडी परिसरात काढलेल्या त्या वाघाच्या व्हिडिओचे व्हायरल सत्य "सकाळ'ने शोधून काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ शूट करणाऱ्याशी संपर्क साधला. व्हिडिओतील वाघाविषयी प्रश्‍न विचारताच तो गांगरला. ""साहेब, हा व्हिडिओ मी काढला नाही. मला व्हॉटस ऍपवर तो कोणीतरी टाकला होता. तो मी फॉरवर्ड केला.'' त्या व्यक्तीच्या मित्रानेही हीच कथा सांगितल्याने पितळ उघडे पडले. त्यामुळे वाघाचा तो व्हिडिओ लांडगा आला रे आला... या गोष्टीसारखा निघाला. 

वनाधिकारी काय म्हणाल्या... 
वाघाच्या वास्तव्याविषयी सकाळने तालुका वनाधिकारी अश्‍विनी दिघे यांच्याशी संपर्क साधला. ""या परिसरात वाघाचे वास्तव्य नाही. निघोज परिसरात बिबट्याचा वावर आहे. जेव्हा हल्ले होतात, तेव्हा कोणीतरी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करतात. तो व्हिडिओ आपल्या भागातील नक्कीच नाही.'' अशा ठामपणे दिघे यांनी दावा केला. त्यांच्या दाव्यामुळे वाघाच्या वास्तव्याचा कांगावा उघड पडला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumours spread of tiger in social media