रुपेशच्या आयुष्याची दोरी होती बळकट!; जखमी होऊन कालव्यात पडूनही सात दिवस जिवंत

शिवाजी चौगुले
Sunday, 7 February 2021

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुपेशची ही चित्तथरारक कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

शिराळा : जखमी अवस्थेत अन्न पाण्याशिवाय सात दिवस तो ऊन व थंडी झेलत पाण्यात निपचित पडला होता. त्याला हालता येत नव्हते. अंगावरील जखमांवर किडे, मुंग्या फिरत होत्या. तो ज्या ठिकाणी पडला होता, तेथून कालव्याचे पाणी जात होते. मात्र पाण्याचा प्रवाह कमी असल्याने त्याच्या अंगाखालून पाणी चालले होते. प्रवाह जास्त असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता, पण त्याच्या आयुष्याची दोरीच बळकट होती.... मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुपेशची ही चित्तथरारक कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

रुपेश विष्णू कदम (वय 26) हा अमेणी पैकी खोंगेवाडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील तरुण. तो 30 जानेवारी रोजी कोकरूड (ता. शिराळा, जि. सांगली) येथे मामांच्या घरी आला होता. तेथे त्याने आपल्या मामासोबत जेवण केले व परत गावी गेला. मात्र रात्र झाली तरी गावी पोहोचला नाही.

दुसऱ्या दिवशीही घरी न आल्याने, त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली. मात्र मामानी तो रात्रीच परत गेल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध सुरू झाला. पण तो सापडला नाही, त्यामुळे त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची फिर्याद 1 फेब्रुवारीला कोकरूड पोलिस ठाण्यात दिली. 

शनिवारी (ता. 6) सकाळी तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते. पण शेतात पुरेसे पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. त्यावेळी त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेताजवळ कोकरूड ते तुरुकवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पहुडलेला तरुण आढळून आला. सोबत मोटारसायकलही होती. 

दरम्यान, तरुण बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे सर्वत्र फिरत होती. त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील, एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेतून त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. 

अतिदक्षता विभागात उपचार
रुपेश कदम बेपत्ता असल्याची फिर्याद 1 फेब्रुवारी रोजी त्याच्या वडिलांनी कोकरूड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार तो आज सापडल्याने तो उपचार घेत असलेल्या कोल्हापूर येथील रुग्णालयात जाऊन, त्याच्या नातेवाईकांना भेटून, तो रुपेशच असल्याची खात्री केली. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
- एस. एल. मोरे, सहायक पोलिस फौजदार, कोकरूड ठाणे 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupesh's life was strong !; He was injured and fell into the canal but survived for seven days