सचिनभाई एंट्रन्स तो पास हो गया! 

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मायणी - मायणी अर्बन बॅंकेच्या निवडणुकीची सर्वांगीण तयारी करूनही स्वतःसह सहकाऱ्यांचेही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने नामुष्की झालेले सचिन गुदगे जिल्हा परिषद निवडणुकीच्या एंट्रन्स परीक्षेत मात्र पास झाले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध झाल्यामुळे समर्थकांसह तेही आनंदून गेले आहेत. आता मुख्य परीक्षेत मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहाणार आहे. 

मायणी - मायणी अर्बन बॅंकेच्या निवडणुकीची सर्वांगीण तयारी करूनही स्वतःसह सहकाऱ्यांचेही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने नामुष्की झालेले सचिन गुदगे जिल्हा परिषद निवडणुकीच्या एंट्रन्स परीक्षेत मात्र पास झाले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध झाल्यामुळे समर्थकांसह तेही आनंदून गेले आहेत. आता मुख्य परीक्षेत मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, त्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहाणार आहे. 

माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या निधनानंतर गुदगेवाडा दुभंगला. मायणी अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांच्यातील भाऊबंदकीला उधाण आले. सुसंवाद हरवल्याने राजकीय महत्त्वाकांक्षेपायी दोघे एकमेकांना पाण्यात पाहू लागले. त्यातच मायणी अर्बन बॅंकेची निवडणूक लागली. विद्यमान अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांच्या विरोधात शड्डू ठोकून बॅंकेच्या निवडणुकीत सचिन उतरले. त्यासाठी सुरेंद्र यांच्या सर्व विरोधकांची मोट बांधण्यात आली. सर्वांनी पडद्याआडून सहकार्य कऱण्याचे आश्वासन दिले. काहीही करून निवडणूक जिंकायचीच, असा निश्‍चय करून सचिन कामाला लागले. सुरेंद्र यांचे विरोधक असलेले माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेते व कार्यकर्त्यांनीही सचिनच्या पाठीवर हात टाकत लढण्याचे बळ दिले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना काही चुका राहून गेल्याने सचिन गुदगे यांच्यासह समर्थक उमेदवारांचेही अर्ज अवैध ठरले. सचिन यांनीही सुरेंद्र यांच्या उमेदवारीवर विविध मुद्यांवर हरकत घेतली. त्या हरकतींचा पाठपुरावा करीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, सुरेंद्र गुदगेंच्याच बाजूने निकाल लागला. परिणामी निवडणुकीसाठी केलेली सर्व पूर्वतयारी वाया गेली. सचिन यांचे समर्थकही कमालीचे नाराज झाले. तर, अर्ज भरता येत नाही अन्‌ राजकारण करायला निघालेत, असे चिमटेही त्यांच्या विरोधकांनी त्यावेळी काढले. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पूर्वीच्या चुका टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली. उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचा मोठा आनंद सचिन यांच्यासह कार्यकर्त्यांनाही झाला आहे. त्यामुळेच "आता गुलाल आपलाच' अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्यात. अर्ज वैध ठरल्याने एंट्रन्स परीक्षेत सचिन पास झालेत. खरी परीक्षा तर 21 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावेळी मतदारांकडून किती गुण दिले जातात, यावर त्यांचे यश अवलंबून असणार आहे. त्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारापर्यंत त्यांना पोचावे लागणार आहे. त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. 

दरम्यान, सचिन यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेची उत्सुकता असलेले कार्यकर्ते सचिनभाई एंट्रन्स तो पास हो गया, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

Web Title: Sachin gudage District Council elections