राजू शेट्टी आमदारकीसाठी बारामतीला दत्तक गेले...

शांताराम पाटील
Wednesday, 17 June 2020

राजू शेट्टी यांच्यावर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज टीका केली.

इस्लामपूर (सांगली) - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेेते राजू शेट्टी हे बारामतीमध्ये दत्तक गेल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आंदोलन का करत नव्हते याचे उत्तर त्यांच्या आमदारकीत दडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

मंगळवारी राजू शेट्टी यांनी बारामती येथील गोविंदबाग मध्ये जात आपली आमदारकी निश्‍चित केली. यावर सदाभाऊ खोत म्हणाले, “ मी कृषी राज्यमंत्री असताना बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेल्यावर राजू शेट्टी यांनी माझ्यावर टीका केली होती. मात्र मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून शेतकर्‍यांच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी बारामतीला त्यावेळी गेलो होतो. मात्र शेट्टी यांनी बारामती येथे दत्तक जाऊन आपली आमदारकी मिळवली आहे.

वाचा - शरद पवार यांनी शब्द पाळला !... माजी खासदार राजू शेट्टी होणार आमदार

आज शेतकर्‍यांचा शेतमाल पडून आहे. शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळेना. अनेक अडचणींना शेतकरी सामोरे जात आहेत. असे असूनही राजू शेट्टी गप्प का असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला होता. त्यांना बारामतीमध्ये मिळालेल्या आमदारकीमधून या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. ज्या प्रस्थापित राजकारण्यांच्याविषयी जनतेमध्ये रोष होता, त्यांच्या विरोधात शेतकरी व कष्टकर्‍यांनी राजू शेट्टींना ताकद देत दोन वेळा खासदार व एक वेळ आमदार केले. प्रस्थापितांच्या विरोधात जनता प्राणपणाने लढली. दोन शेतकर्‍यांचा बळी गेला. ज्यांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली त्यांच्या घरात जाऊन राजू शेट्टींनी लोटांगण घातले व आमदारकी मिळवली. हे लोकांना रुचणार नाही. तरीही मी त्यांचे सभागृहात स्वागत करेन. किमान राजू शेट्टींनी तिथे तरी प्रामाणिक रहावे. मी मंत्री झाल्यावर शेट्टींनी मोठ्या प्रमाणात टीका व आरोप केले. राज्य सरकारच्या विरोधात संपुर्ण सातबारा कोरा करावा म्हणून आंदोलन केले. दुधाचे आंदोलन उभा केले. शेतकर्‍यांचा शेतमाल मंत्रालयासमोर ओतला. आज शेतकर्‍यांची भयानक परिस्थिती आहे. आमच्या सरकारच्या काळात 50 वर्षात जेवढी शेतमालाची खरेदी झाली नव्हती तेवढा शेतमाल खरेदी केला. मात्र आज कापूस, मका, तूर, सोयाबीन पडून आहे. दुधाचे भाव उतरले आहेत. शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नाही. कर्जमाफी मिळालेली नाही. तरीही राजू शेट्टी आंदोलन का करत नव्हते याचे उत्तर त्यांच्या आमदारकीतून मिळाले.” असं ही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadabhau khot comment on raju shetti baramati visit