सदाभाऊ खोत, पडळकरांनी मारले  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण 

corona
corona

सांगली ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या, चिंताजनक मृत्यूदर आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला येत असलेले अपयश याचा निषेध करत माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. कोरोना रुग्णांची फरफट सुरु आहेच, शिवाय जे कोरोना बाधित नाहीत त्यांनाही वेळेत उपचार मिळत नाही. माणसे मरायला लागली तरी यंत्रणा इतकी बेसावध कशी, असा संतप्त सवाल श्री. खोत यांनी यावेळी विचारला. 


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारात त्यांनी ठाण मांडले. तेथेच त्यांनी डबा सोडला आणि जेवण केले. जोवर परिस्थिती सुधारणा होण्यासाठी हालचाली करत नाही तोवर मी इथून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यात असलेले जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दौरा सोडून तेथे येत दोन्ही आमदारांशी चर्चा केली. 


जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की खासगी दवाखाने कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करत नाहीत. कोरोना तपासणीचा अहवाल आहे का, असे आधी विचारले जाते. अहवाल आल्याशिवाय आम्ही उपचार करणार नाही, असे सांगितले जात असल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. ऑक्‍सिजन आणि वेंटिलेटर तुटवड्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी गावागावात स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. जिल्ह्यातील सर्व सिटी स्कॅन सेंटर 24 तास सुरु ठेवावीत. तालुका आरोग्य समन्वय कक्ष स्थापन करावा. सर्व रुग्णांना विनाअट रॅपीट अँटीजेन तपासणीची परवानगी द्यावी. कोविड सेंटरमध्ये काम करणारा कर्मचारी दगावला तर त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची हमी द्यावी. स्वॅबचा अहवाल 12 तासाच्या आत मिळावा, अशी मागणी करण्यात आली. या स्थितीत लवकर सुधारणा झाली नाही तर पुन्हा आंदोलन करावे लागेल, रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिले. 


यावेळी भाजप नेते राहूल महाडिक, भास्कर कदम, किरण उथळे, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, बजरंग भोसले, विनायक जाधव, शंकर जाधव, नानासाहेब धुमाळ, अमोल पडळकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com