'या' माजी आमदाराचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

san_sada_patil.jpg
san_sada_patil.jpg

सांगली-सत्तेची फार काळजी करु नका. एका पावसाने सत्ता येते नी जाते. खानापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही सदाशिवराव पाटील यांच्या पाठीशी राहू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले. 

खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुमनताई पाटील, विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, रावसाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. 

विटापालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, माजी सरपंच, विकास सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक, लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सोहळ्यासाठी मतदार संघातून मोठी गर्दी झाली होती. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट संकूलच्या आवारात गर्दी झाली होती. 

श्री. पवार म्हणाले,""मला खानापूर मतदार संघाने पहिल्यापासून साथ दिली आहे. खानापूरचे हणमंतराव पाटील आमदार असतानाच या मतदार संघाशी माझे नाते जुळले. मध्यंतरीच्या काळात सदाशिवराव पाटील पक्षात नव्हते, तरीही ते कधी पक्षात नसल्याचे जाणवले नाहीत. आम्ही त्यांना आमचेच मानायचो. भागात पाणी नसतानाही परदेशातही द्राक्ष, डालिब निर्यात केली आहे. येथील गलाई व्यावसायिक देशभरात स्थायिक झालेत. संकटावर मात कशी करायची हे या मतदार संघातील लोकांना चांगले माहिती आहे. तुमचा मतदार संघाच्या विकासात उद्दिष्ट माझ्या समोर आहे. सत्तेची चिंता करु नका, लोकांवर विश्‍वास ठेवा. एका पावसान सत्ता येते अन्‌ जाते.'' 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,""सदाभाऊंच्या प्रवेशासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवरही प्रवेश झाला असता तर चित्र वेगळे दिसले असते. तरीही त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच प्रवेश केला आहे. विटा नगरपालिका, जि. प., पं. स. सह सन 2024 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात मोठा पक्ष असेल.'' 

माजी आमदार श्री.पाटील म्हणाले,""निवडणुकीपूर्वी पवारसाहेबांशी दोनदा चर्चा झाली. लोकांच्या भूमिकेमुळे अपक्ष लढलो. निवडणूकीत ज्यांनी मदतीचा शब्द दिला त्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर मी राष्ट्रवादीत जाण्याची तयारी केली. प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी सत्ता येण्याची शक्‍यता नव्हती. सत्ता नसती तरीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतोच. सन 1980 मध्ये पवारसाहेबांना वडिलांनी साथ दिली. यापुढे तुमच्याबरोबर कायम राहू. राष्ट्रवादीकडून काही मागणार नाही. सन्मानाची वागणूक आणि कामाची अपेक्षा आहे.'' 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळिक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची भाषणे झाली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, राहुल पवार, दिग्विजय सुर्यवंशी, विष्णू माने, सुशांत देवकर, उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, किरण तारळेकर, मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा चोथे, पं. स. सदस्य संजय मोहिते, आटपाडीचे तुषार पवार, प्रभाकर नांगरे-पाटील, विसापूरचे चंदूनाना पाटील, लेंगरेचे श्रीरंग शिंदे, माधळमुठीचे सरपंच सिद्धेश्वर धावड, संपत मोरे, अविनाश चोथे, प्रताप सुतार आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com