सागरेश्‍वरला पर्यटक, सहली, निसर्गप्रेमींची वर्दळ बंदच 

स्वप्नील पवार
Friday, 14 August 2020

मार्चपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शासन निर्णयाने हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य बंद आहे.

देवराष्ट्रे : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य व हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात राज्य व परराज्यातून पर्यंटक व शालेय सहली निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यास येतात. मार्चपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शासन निर्णयाने अभयारण्य बंद आहे. अभयारण्य प्रशासनास मिळणारे मिळणारे लाखोंचे उत्पन्न बुडाले. निसर्गाचा आनंद घेण्यास येणारे पर्यटक व निसर्गप्रेमी यांचा हिरमोड झाला. 

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य वन्यजीव विभागास दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते. सह्याद्रीच्या कुशीत असलेले अभयारण्य श्रावणात हिरवाईने फुलते. हरणांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे त्यांचे दर्शन व छोटे छोटे धबधबे, प्राचीन हेमाडपंथी मंदिर, श्री क्षेत्र दक्षिण काशी सागरेश्वर देवस्थाननजीक असल्याने राज्य व परराज्यातून अभयारण्य पाहण्यास पर्यटकांची गर्दी होते. 

अभयारण्याची निर्मिती वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचा ध्यास व लोकसहभागातून झाली. अभयारण्याचे क्षेत्रफळ 10.87 चौरस किलोमीटर आहे. या ठिकाणी असणारा किर्लोस्कर पॉइँट, फेटा, पोइंट, महालगुंड, मृगविहार, छत्री बंगला, बांबुकुटी, बालोद्यान याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा करण्यात आहे. निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. 

येथे 142 प्रजातीच्या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. साळुंखी, सुगरण, सूर्यपक्षी, पिंगळा, सुतारपक्षी, कोकीळ, पोपट, पावशा आदी पक्षी आहेत. पक्षी निरीक्षक येथे येतात. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास जुय्वेल येथे आहे. 

दिवंगत माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्यासाठी भरघोस निधी देऊन अभयारण्याचा कायापालट केला. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी बांबू हाउसची उत्तम सोय आहे. त्यामुळे सागरेश्वर वन्यजीव विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली. या उत्पन्नातून वन्यजीव प्रशासनास 50 टक्के व ग्राम परिस्थितीकीय विकास समितीस 50 टक्के मिळत होते. त्यातून सागरेश्वर वन्यजीव विभाग अभयारण्यात सोयी सुविधासाठी खर्च करतात. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती गावातील सोयी सुविधांसाठी खर्च करते. 

कोरोनामुळे अभयारण्य बंद आहेत. त्यामुळे यावर्षी अभयारण्य व गावातील होणाऱ्या विकासास ब्रेक लागला. निसर्गप्रेमींना अभयारण्य बंद असल्याने निसर्गाचा आस्वाद घेता येणार नाही. 

कोरोनामुळे सागरेश्वर अभयारण्य शासन आदेशाने मार्चपासून बंद आहे. श्रावणात हजारो पर्यटक, सहली व निसर्गप्रेमी येतात. चांगले उत्पन्न मिळते. त्यातून अभयारण्य विकासाचा आराखडा केला जातो. परंतु यंदा लाखोंचे उत्पन्न बुडाले. त्याचा परिणाम विकासावर होणार आहे.'' 

अनिल जेरे, सहाय्यक वनसंरक्षक, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagareshwar is closed to tourists, picnickers and wildlife lovers