
बिबट्याचा वावर लगतच्या गावामध्ये असल्याचीही चर्चा आहे
देवराष्ट्रे - यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव
अभयारण्यात लावलेल्या कॅमेरा ट्रपमध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शेजारच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून व ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी १५ फूट उंचीच्या कुंपणाचा नवीन आराखडा तयार करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करा, हे काम शासन स्तरावर मंजूर होईलच परंतु सद्यस्थितीतील ७ फूट उंचीच्या कुंपणाच्या दुरुस्तीचे आणि अपूर्ण काम तातडीने सुरू करा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना दिले आहेत.
डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना येथे कृषी राज्यमंत्रीडॉ. विश्वजित कदम यांनी सागरेश्वर अभयारन्यातील विविध प्रश्नावर विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्याशी चर्चा केली. यावेळी सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व डॉ. जितेश कदम उपस्थित होते.
यावेळी डॉ. विश्वजित कदम म्हणाले, बिबट्याचा वावर लगतच्या गावामध्ये असल्याचीही चर्चा आहे. यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करावे, ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कार्यकालात २०१३ येथे मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. आता येथील अपूर्ण असलेली व गरजेची असलेली सर्व कामे हाती घेण्याच्या दृष्टीने तत्परतेने काम करा, असे विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
विभागीय वनअधिकारी विशाल माळी म्हणाले, सागरेश्वर अभयारण्याचा विस्तार सुमारे एक हजार सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रात आहे. स्थानिक वन विभागाला अभयारण्यात असलेला बिबट्याला थेट पिंजरा लाऊन पकडण्याचे अधिकार नाहीत. यावेळी सागरेश्वर अभयारण्यालगतच्या गावातील काही नागरिक उपस्थित होते .
डीपिटीसी मधून निसर्ग सफारी बससाठी निधी देणार
सागरेश्वर अभयारण्य परिसरात दुचाकी किंवा पायी जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितच्या कारणास्तव बंदी आहे. मात्र आता जिल्हा नियोजन मधून येथे निसर्ग सफारी बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल असे कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.
दत्ता भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा
सागरेश्वर अभयारण्य परिसरात बिबट्याचा वावर आहे. नागरिकांत भीती आहे. याप्रश्नी
योग्य ती खबरदारी घेणे तसेच येथील कुंपण आणि अंतर्गत सोयी सुविधा बाबत
कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी
वन विभागाचे राज्य मंत्री दत्ता भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
संपादन - धनाजी सुर्वे