साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक 300 रुपये रोजंदारीवर शेतमजुरीला 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

त्यानं गेली सहा-आठ महिने चकार शब्द लिहला नाही. शब्द हीच संपत्ती... पण, ती घासभर अन्न देत नसेल तर...

सांगली ः सन 2018 साली सांगलीसाठी एक सुखद बातमी आली. साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार नवनाथ गोरे नावाच्या लेखकाला मिळाल्याची ती बातमी होती. कोण हे गोरे? नाव अजिबात परिचयातील नव्हते. सभा, समारंभात उठबस असणाऱ्या परिचित साहित्यिकांतही या नावाचा कधी उल्लेख ऐकला नव्हता. शोधल्यावर सापडले, की हे नवनाथ गोरे जत तालुक्‍यातील निगडी बुद्रुक गावचे. उसाचा पाला लावून उभारलेल्या झोपडीत राहणारे... बांधकामावर विटा उचलण्याचे काम करणारे... एम.ए.बी.एड्‌ शिकून नोकरीसाठी उंबरे झिजवणारे... त्यांच्या "फेसाटी' या पुस्तकाला तो पुरस्कार मिळाला होता... दोन वर्षे झाली त्याला... 

आज पुन्हा एकदा नवनाथ यांची आठवण यायला कारण तसंच आहे, मात्र ते वेदनादायक आहे. नवनाथ यांच्यावर आज लोकांच्या शिवारात 300 रुपये रोजंदारीवर शेतमजुरी करण्याची वेळ आली आहे. नवनाथ आज बाजरी काढायला जातात, उसाचा पाला वेचायला जातात. गरज पडली तर टिकाव, फावडं घेऊन खड्डे काढणे, वाफे ओढण्याचे कामही करतात. सकाळी सहा दे दुपारी दोन या वेळेत काम केले तर 300 रुपये मिळतात, तेच सहापर्यंत राबले तर 400 रुपये. घरी आई आणि एक भाऊ... तीन माणसांचे कुटुंब. अत्यंत दुर्गम, दुष्काळी गावात ते राहतात आणि शिरपेचात "साहित्य अकादमी पुरस्काराचा मानाचा तुरा' सोडला तर सांगता येईल, अशी काहीच कमाई नाही. खूप प्रयत्न केले, झटले, हातपाय मारले. नगर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या महाविद्यालयात नोकरी दिली, तासिका तत्त्वावर ते हजरही झाले... तोवर कोरोनाचे संकट आले. महाविद्यालय बंद झाले. तासिका तत्त्वाचा विषयच राहिला नाही. कमाई थांबली. काही दिवस पाणी पिवून जगण्याची वेळ आली. सांगणार कुणाला? दुःख मांडणार कुणाकडे? हा माणूस कष्टाला कधीच लाजला नव्हता. त्यांनी जगण्यासाठी पुन्हा हाती खुरपं घेतलं, फावडं घेतलं आणि शिवार गाठलं. 
मध्यंतरी इस्लामपूरचे पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी त्यांना मदत देऊ केली. त्यांच्या नोकरीसाठीही शब्द टाकला. त्याला यश येईल, असे वाटत असताना अडचणींचा नवा डोंगर उभा राहिला. आता या माणसाने हातात पेन घेतला नाही.

त्यानं गेली सहा-आठ महिने चकार शब्द लिहला नाही. शब्द हीच संपत्ती... पण, ती घासभर अन्न देत नसेल तर... नवनाथ अस्वस्थ आहेत, मात्र खचलेले नाहीत. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""मी कष्टाला मागे हटणारा नाही. माझ्या गरजा फार कमी आहेत. फार मोठ्या पगाराची नोकरी नकोय मला. शिक्षक, प्राध्यापक अगदी क्‍लार्क म्हणून काम मिळाले तरी चालेल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahitya Akademi Award winning author earns Rs 300 PER DAY