ट्रेकिंगसह घनदाट जंगलात करा मुक्काम!

Sahyadri-Mountain
Sahyadri-Mountain

सातारा - अवतीभवती डोंगरझाडी, समोर उभा असलेला वासोट्याचा किल्ला, निळंशार पाणी, जंगलातील त्या निरव शांततेत जवळूनच कुठून तरी येणारा पानकोंबड्यांचा आवाज, आसपास अस्वल, गवे, सांबर, रानकुत्री आदींचे सानिध्य आणि सोबत जाणकार वाटाड्या... सुमारे पाच किलोमीटर अंतराचा ट्रेक जंगलवाटा तुडवत सहकुटुंब करावा आणि हा सारा थरार जवळून अनुभवायचा असेल तर एकवेळ प्रत्येकाने बामणोलीजवळ कळकोशी ते आंबवडे हा ट्रेक जरूर केला पाहिजे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १) कळकोशी ते आंबवडे ही निसर्गभ्रमण वाट (ट्रेकिंगचा मार्ग) खुली करण्यात आली. साताऱ्याच्या पश्‍चिमेला बामणोलीजवळ मुनावळे फाटा लागतो. या फाट्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर (तीथपर्यंत चारचाकी गाडी जाते) कळकोशी फाटा आहे. याच ठिकाणाहून ट्रेकला सुरवात होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रात (बफर झोन) असलेल्या गावांना रोजगार निर्मितीसाठी व्याघ्र प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. जंगल भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्थानिकांच्या मदतीने प्रकल्प व्यवस्थापनाने ट्रेकिंगचा मार्ग सुकर केला आहे. 

कळकोशी फाटा येथून हा ट्रेक सुरू होतो. डोंगरकाठाने वळणे घेत जाणाऱ्या पायवाटा, हिरवीगच्च झाडी, मधेच डोंगरातून वाहत आडवे येणारे ओहोळ, त्यातून भ्रमंती करताना कधीच थकवा जाणवत नाही. शिवसागर जलाशयाच्या व समोर दिसणाऱ्या वासोटा किल्ल्याच्या साक्षीने रानवाटा तुडवत आपण कधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या आंबवडे गावात पोचतो, हे कळतही नाही. 

या जंगलात बिबट्याचा वावर आहे. परंतु, त्याने कधी दर्शन दिलेले नाही. सांबर, साळींदर, गवे, अस्वल, ससे, रानडुकरे यांचा हे वावर क्षेत्र असल्याने या वन्यजिवांच्या दर्शनाची शक्‍यता अधिक आहे. आंबवडेजवळ वन्यजिवांसाठी गवताळ कुरण राखून ठेवण्यात आले आहे. दुर्बिणीतून वन्यजिवांचे दर्शन घेण्याची नामी संधी मिळू शकते. आंबवडेत वन्यजीव विभागाने तीन ‘टेन्ट हाउस’ उभारली आहेत. त्यामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय आहे. या संदर्भात बामणोलीचे वनपाल गावित यांनी सांगितले, की ‘‘स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी चहा-न्याहारी व जेवण उपलब्ध करून देण्यात येईल. ‘भ्रमंती’ या मोबाईल ॲपद्वारे या सर्वांची माहिती पर्यटकांना लवकरच देण्यात येईल. पर्यटकांसाठी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरमध्ये या भ्रमण मार्गासाठी पर्यटकांची नोंदणी सुरू होईल.’’

डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत स्थानिकांच्या रोजगारासाठी निसर्ग भ्रमण मार्ग खुले करत आहोत. पर्यटक व त्याचे संयोजन स्थानिक लोक पाहतील. अशा पद्धतीने रोजगाराची एक संधी जन-वन विकास योजनेतील गावच्या लोकांना मिळेल.
- डॉ. विनिता व्यास, उपसंचालिका, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com